रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये जनतेला दिसतो रावण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:39 AM2017-10-01T00:39:27+5:302017-10-01T00:39:27+5:30
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये नागरिकांना रावण दिसतो. या खड्ड्यांच्या रुपातील रावणाचा महापालिकेने आगामी वर्षभरात नायनाट केला पाहिजे, असा भेदक बाण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी महापालिकेवर सोडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये नागरिकांना रावण दिसतो. या खड्ड्यांच्या रुपातील रावणाचा महापालिकेने आगामी वर्षभरात नायनाट केला पाहिजे, असा भेदक बाण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी महापालिकेवर सोडला.
सिडकोतील एन-७ येथील रामलीला मैदानावर उत्तर भारत संघातर्फे विजयादशमीनिमित्त आयोजित केलेल्या रावणदहन कार्यक्रमाच्या वेळी बागडे यांच्या बाणामुळे आमदारांसह आजी माजी नगरसेवकही घायाळ झाले.
रामलीला मैदानावर सायंकाळी ‘प्रभू श्रीरामचंद्र की जय’ अशा जयघोषात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रावणदहन करण्यात आले. याप्रसंगी आ. अतुल सावे, उद्योगपती आर. एल. गुप्ता, शेखर देसरडा, नगरसेविका सुरेखा खरात, शिरीष बोराळकर, नगरसेवक राजू शिंदे, अनिल मकरिये, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती, माजी नगरसेवक अनिल जैस्वाल, विश्वनाथ स्वामी, संस्थापक सी. के. दीक्षित, उत्तर भारत संघाचे अध्यक्ष एल. एन. शर्मा, उपाध्यक्ष बच्चूसिंग लोधी, कोषाध्यक्ष ओमीराम पटेल, सचिव विनोदकुमार दीक्षित, उदयभान डागर आदी उपस्थित होते.
बागडे यांच्यासह उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. रामलीला मैदानावर उभारण्यात आलेल्या पुतळ्याभोवती पारंपरिक पद्धतीने रिंगण करून वाद्यांचा गजर सुरू होता. रावणदहनापूर्वी फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळून निघाले. रावणदहन होताच फटाक्यांचा दणदणाट झाला. यावेळी विजयादशमीच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी बंटी दीक्षित, मुकेश शर्मा, सी. पी. पटेल, मुकेश लोधी, सुर्जनसिंह, वैजनाथ सिंह, शिवसिंह, जगदीश प्रसाद राजपूत यांनी परिश्रम घेतले.