बागडे नानांचे चॅलेंज आणि खैरे का गुस्सा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:02 AM2021-03-21T04:02:02+5:302021-03-21T04:02:02+5:30
——————————— उंट तंबूत शिरला की, तो तंबू व्यापतो. औरंगाबादच्या शिवसेनेचा तंबू अंबादास दानवे या शिवसैनिकाने व्यापला. मी कोणाला घाबरत ...
———————————
उंट तंबूत शिरला की, तो तंबू व्यापतो. औरंगाबादच्या शिवसेनेचा तंबू अंबादास दानवे या शिवसैनिकाने व्यापला. मी कोणाला घाबरत नाही म्हणत ते खैरेंची अस्वस्थता वाढवतात आणि शिवसेनेत आपटबार फुटतात. जिल्हा बँकेची निवडणूक साधून सर्वांनीच बार फोडून घेतले.
——————————
मला तीन प्रश्न पडले आहेत. एक- आ. हरिभाऊ बागडे आणि माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्यात देवगिरी किल्ला चढण्याची शर्यत खरोखरच होणार का? आणि होणार असेल तर ती मोफत पाहता येईल का? कारण गेल्या वर्षभरापासून कोरोनाने एवढे पिडले की, आम्ही फक्त जगण्याची शर्यतच पाहतो. त्यापूर्वी बैलाच्या शर्यती, मॅरेथाॅन अशा मैदानी शर्यती होत, त्या आम्ही पाहत असू. (जिलबी, गुलाब जाम खाण्याच्या शर्यतीत आमचा सहभाग असायचा.) म्हणून आमच्यासाठी ही शर्यत सुवर्णसंधी ठरेल. देवगिरीचा फेरफटका होईल. उन्हात राहावे लागणार असल्याने ‘ड’ जीवनसत्त्व मिळेल आणि मोकळ्या हवेत प्राणवायूची पातळीही वाढवून घेता येईल. नानांनी खैरेंना दिलेल्या आव्हानानेच निर्माण झालेला एक प्रश्न म्हणजे नाना खैरेंचा घाम काढतील की, अखेरच्या क्षणी मदतीचा हात पुढे करतील. समजा नानांनी हात पुढे केला तर खैरे हात पकडतील का? आणि खैरेंनी हात पकडला तर अंबादास दानवेंना खैरे कळले नाही, हे खरे मानायचे काय?
आपले नानासुद्धा काहीही प्रश्न विचारतात म्हणे, खैरेंच्या सैनिकी शाळेतून किती सैनिक निर्माण झाले? आता खैरे हेच एक सैनिक असल्याने त्यांच्याकडे पाहता सैनिक तयार करता येत नाही, तो आपोआप तयार होत असतो. खैरेंनी शाळा का काढली, याचा अर्थ असा नव्हे त्यांनी हातात बंदूक घेऊन लेफ्ट-राइट करीत राहावे. पोरांनी यावं, शिकावं, सैनिक व्हावं आणि निघून जावं. हा सरळसोट विचार त्यांनी केला. या शाळेकडे पाहत ते आपल्यातला सैनिक जिवंत ठेवतात. शेवटी काय तर सैनिकीबाणा टिकण्यापेक्षा सैनिक टिकणे महत्त्वाचे. सैन्य उभे करायचे गंमत नाही. नानासाहेब त्यासाठी बाजारबुणगे, कुटुंब कबिला लागतोच. याचे इतिहासात शेकडो दाखले आहेत. ते काही साखर कारखाना, बँक चालवण्यासारखे नाही.
दुसरा प्रश्न- ‘चंद्रकांत खैरे को गुस्सा क्यों आता है?’ अंबादास दानवे म्हटले की, खैरे का उसळतात. परवाही त्यांनी हाच प्रश्न केला. कानामागून आला आणि तिखट झाला, असे त्यांना वाटत असावे. उंट तंबूत शिरला की काय होते, हे आता खैरे अनुभवत आहेत. अंबादास दानवे यांनी जिल्हा व शहर पातळीवरील शिवसेना व्यापली आणि मातोश्रीशी त्यांचा संपर्क असतो. पालकमंत्र्यांसमवेत ते सावलीसारखे असतात. शिवसेनेत आता खैरे-दानवे अशी उघड गटबाजी आहे, ती या स्तरापर्यंत की दोघेही एकमेकांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवतात. आमदारकी, जिल्हाप्रमुख या दोन पदांवर दानवे आहेत, तर खैरेंकडे नेतेपदाशिवाय पद नाही. निवडणुकीचा पराभव जिव्हारी लागला आहे. ‘असतील शिते तर जमतील भुते’ या म्हणीचा ते पदोपदी अनुभव घेतात. संघटना आणि प्रशासकीय या दोन्ही पातळ्यांवर दानवेंचे अस्तित्व दिसते. नेमके हेच कारण ‘खैरे यांच्या गुस्स्या’चे असावे असे तरी प्राथमिक निदान आहे.
‘देवगिरी’ आणि ‘संभाजी’ असे दोन भक्कम बुरूज बांधून नानांनी आपला किल्ला राखून ठेवल्यामुळे ते देवगिरी चढण्याचे चॅलेंज देऊ शकतात. मी साधा आमदार व जिल्हाप्रमुख आहे. खैरे साहेब तर नेते आहेत, असे म्हणणारे दानवे आता राजकीयदृष्ट्या ‘कळते’ झाले, असेच म्हणावे लागेल.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे या सगळ्यांचा उलगडा झाला. हे सगळेच जण एकमेकांना कसे जोखतात, हे लक्षात आले. निवडणुकीच्या खेळाचे खरे खेळाडू संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार हे मंत्रीद्वय मात्र या आखाड्यात कोठेच नाहीत. माजी आ. कल्याण काळे हे एका गटाचे नेतृत्व करतात, तेसुद्धा शांत आहेत. खरे राजकारण तिकडे चालू असावे?
- सुधीर महाजन