बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री महाराजांची हनुमान कथा होणार छत्रपती संभाजीनगरात
By प्रशांत तेलवाडकर | Published: October 20, 2023 03:47 PM2023-10-20T15:47:13+5:302023-10-20T15:47:45+5:30
अयोध्यानगरीत १० लाख भाविकांची बसण्याची व्यवस्था
छत्रपती संभाजीनगर : आध्यात्मिक गुरू बागेश्वर धाम बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री महाराजांचे ५ नोव्हेंबरला शहरात आगमन होणार आहे. ६ ते ८ नोव्हेंबर हे तीन दिवस आयोजित कथेत राज्यभरातून १० लाख भाविक येतील, यादृष्टीने स्टेशनरोडवरील अयोध्यानगरीत ४० एकरवर भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. युवकांना आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी या हनुमान कथेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.
यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत मंत्री अतुल सावे, आ. प्रदीप जैस्वाल, शिरीष बोराळकर यांच्यासह सर्व सकल हिंदू संघटनेचे पदाधिकारी हजर होते. निमंत्रक व स्वागताध्यक्ष डॉ. कराड यांनी सांगितले की, मराठवाड्यात पहिल्यांदा धीरेंद्र शास्त्री महाराजांची हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्यानगरीत हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ५ नोव्हेंबरला सायंकाळी विमानतळावर महाराजांचे आगमन होईल. त्यानंतर वाहन रॅली काढण्यात येणार आहे. ६ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता हनुमान कथेला सुरुवात होईल. ७ नोव्हेंबरला सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान कथा आणि दुपारी ३ ते रात्री ८ वाजेदरम्यान दिव्य दरबार भरणार आहे. ८ नोव्हेंबरला दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान हनुमान कथा होऊन या आध्यात्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. अयोध्यानगर मैदानावर १० लाख भाविक येणार असल्याने त्यादृष्टीने विविध समित्या तयार करून नियोजन केले जात आहे. आयोजनात सकल हिंदू जनजागरण समितीअंतर्गत सर्व जाती-धर्मातील संघटनांचे पदाधिकारी सहभागी होत आहेत.
५० हजार महिलांची कलश शोभायात्रा
६ नोव्हेंबर दुपारी १ वाजता क्रांती चौकातून कलश शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात ५० हजार महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी होणार आहेत. ही शोभायात्रा महावीर चौक मार्गे अयोध्यानगरीत पोहोचणार आहे.
पहिल्या आरतीचा मान सफाई कामगारांना
पं. धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या कथेला ६ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता प्रारंभ होणार आहे. त्यावेळीस महाराजांच्या पहिल्या आरतीचा मान शहरातील सफाई कामगारांना देण्यात येणार असल्याची घोषणा डॉ. कराड यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार
पं. धीरेंद्र शास्त्री महाराजांची हनुमान कथा ऐकण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार आहेत. तसेच भाजपचे राज्याध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा त्यांच्या सोबत असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आमंत्रण दिल्याचे आयोजकांनी सांगितले.