कासलीवाल बिल्डरचा जामीन अर्ज दुस-यांदा फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:45 AM2017-10-29T00:45:31+5:302017-10-29T00:46:05+5:30
बँकेची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात बिल्डर संजय कासलीवालने दाखल केलेला दुसरा नियमित जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रितेश मावतवाल यांनी शुक्रवारी (दि.२७ आॅक्टोबर) फेटाळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बँकेची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात बिल्डर संजय कासलीवालने दाखल केलेला दुसरा नियमित जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रितेश मावतवाल यांनी शुक्रवारी (दि.२७ आॅक्टोबर) फेटाळला.
कासलीवाल बिल्डरने बँकेची आणि ग्राहकांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक संजय फिरके यांनी दिली होती. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून त्याला २९ सप्टेंबर २०१७ रोजी अटक केली होती. न्यायालयाने त्याला ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर न्यायालयाने त्याचा पहिला नियमित जामीन अर्ज फेटाळला. त्याने या निर्णयास सत्र न्यायालयात आव्हान दिले असता अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनीदेखील जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्याची हर्सूल कारागृहात रवानगी झाली होती.
दरम्यान, कासलीवाल बिल्डरने नियमित दुस-यांदा जामीन अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी झाली असता सहायक सरकारी वकील शोभा विजयसेनानी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, तपास प्राथमिक अवस्थेत आहे. गेल्या वेळेस दाखल केलेल्या जामीन अर्जात आणि दुस-यांदा दाखल केलेल्या जामीन अर्जातील मुद्दे समान आहेत, सर्वाेच्च न्यायालयाने आर्थिक गुन्ह्यात अडकलेल्या आरोपींना जामीन देण्यात येऊ नये असा निर्णय दिलेला आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये प्रगती झाली असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे न्यायालयाने याची दखल घेऊन कासलीवालचा अर्ज फेटाळला.