आंतरधर्मीय प्रेमविवाहामुळे जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला जामीन नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 12:42 PM2024-08-31T12:42:50+5:302024-08-31T12:43:14+5:30

पसार होण्यास मदत करणाऱ्याचाही अटकपूर्व जामीन नामंज़ूर

Bail denied to father-in-law who killed son-in-law due to inter religious love marriage | आंतरधर्मीय प्रेमविवाहामुळे जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला जामीन नाकारला

आंतरधर्मीय प्रेमविवाहामुळे जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला जामीन नाकारला

छत्रपती संभाजीनगर : आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्यामुळे जावयाचा खून करणारा सासरा गीताराम भास्कर कीर्तिशाही (५०, रा. इंदिरानगर गल्ली नं.६, गारखेडा परिसर) याचा नियमित जामीन अर्ज आणि गुन्ह्यात गीताराम याला पसार होण्यास मदत करणारा आरोपी अभिषेक उर्फ अभि संजयसिंग जनकवार याचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी नामंजूर केला.

अर्जाच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी लोकअभियोक्ता डी. ए. वाकनकर यांनी न्यायालयास विनंती केली की, गुन्हा गंभीर असून, गुन्ह्यात आठ आरोपी आहेत. मुलीच्या जीवितास धोका आहे. जामीन दिल्यास ते साक्षीदारावर दबाव आणू शकतात. विशेष म्हणजे ही ऑनर किलिंगची घटना असताना पोलिसांनी फक्त कलम १०३ (१) खुनाचे कलम लावल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने हा खून आंतरजातीय विवाह आणि ऑनकिलिंगची घटना असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले आहे.

गुन्ह्यात यापूर्वी आरोपी चुलता विशाल उर्फ आप्पासाहेब कीर्तिशाही (३५), आरोपी पिता गीताराम कीर्तिशाही आणि गीताराम याला गुन्हा घडल्यानंतर लपविण्यास मदत करणारा त्याचा जावई स्वप्नील पाटेकर अशा तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मृत अमित साळुंके यांनी दि. २ मे रोजी इंदिरानगरातील विद्या गीताराम कीर्तिशाही हिच्यासोबत पुण्यात आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता. या लग्नाला विद्याच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे नवदाम्पत्य महिनाभर पुण्यात राहिले. काही दिवसांनी अमितच्या कुटुंबाने त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलावून घेतले. लग्न होऊन अवघे अडीच महिने गीताराम आणि आप्पासाहेब यांनी दि. १४ जुलैच्या रात्री अमितला गाठून चाकूने भोसकले. उपचार सुरू असतानाच त्याचा २५ जुलै रोजी मृत्यू झाला होता.

दरम्यान, आरोपी अभिषेक उर्फ अभि जनकवार याने गीताराम याला पोलिसांपासून वाचविण्यासाठी त्याला जिओ कंपनीचे सीमकार्ड देऊन पसार केल्याचे तपासात समोर आले. गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी जनकवार याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, तर आरोपी गीताराम याने नियमित जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता.

Web Title: Bail denied to father-in-law who killed son-in-law due to inter religious love marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.