बजाजनगर ममता हॉस्पिटलची आरोग्य विभागाकडून झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:03 AM2021-05-26T04:03:26+5:302021-05-26T04:03:26+5:30

: रुग्ण हक्क परिषद संघटनेतर्फे आंदोलन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे सविस्तर अहवाल; तीन आठवड्यांपूर्वीच रुग्णालयाबद्दल आल्या होत्या तक्रारी वाळूज महानगर ...

Bajajnagar Mamta Hospital's Health Department | बजाजनगर ममता हॉस्पिटलची आरोग्य विभागाकडून झाडाझडती

बजाजनगर ममता हॉस्पिटलची आरोग्य विभागाकडून झाडाझडती

googlenewsNext

: रुग्ण हक्क परिषद संघटनेतर्फे आंदोलन

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे सविस्तर अहवाल; तीन आठवड्यांपूर्वीच रुग्णालयाबद्दल आल्या होत्या तक्रारी

वाळूज महानगर : थकीत बिल भरण्यावरून मृतदेह अडवून ठेवणाऱ्या बजाजनगरातील ममता हॉस्पिटलची सोमवारी रात्रीच आरोग्य विभागाकडून झाडाझडती घेण्यात आली.

बजाजनगरातील ममता हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सोमवारी थकीत सव्वा लाखाच्या बिलासाठी सिडको वाळूज महानगरातील एका कोविड रुग्णाचा मृतदेह तब्बल साडेपाच तास अडवून ठेवला होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर सायंकाळी उशिरा मयत रुग्णाचा मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आला होता.

केवळ पैशाच्या हव्यासापोटी मृतदेह अडवून ठेवल्याने वाळूज उद्योगनगरीत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. दरम्यान, या रुग्णालयासंदर्भात रुग्ण न्याय हक्क परिषद संघटनेच्या वतीने तीन आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारीनंतर तसेच मृतदेह पैशासाठी अडवून ठेवल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच जिल्हा परिषदेचे साथरोग अधिकारी डॉ. कुडलीकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विजय वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामणे आदींच्या पथकाने सोमवारी सायंकाळी या हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत ममता हॉस्पिटलच्या वतीने कोविड सेंटर सुरू करण्यासाठी ज्या जागेची निवड केली त्याऐवजी दुसऱ्याच ठिकाणी सेंटर सुरू केल्याचे चौकशीत समोर आले होते. याशिवाय २० रुग्ण भरती करण्याची परवानगी असताना अधिकचे रुग्ण भरती केल्याचे आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले होते. या प्रकरणी सविस्तर अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बामणे यांनी दिली.

दरम्यान, हॉस्पिटल संदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने आज रुग्ण न्याय हक्क परिषद संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली.

चौकट..

कारवाई निश्चितच होईल

या सर्व प्रकरणासंदर्भात प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोग्य विभागाच्या पथकाकडून या हॉस्पिटलची चौकशी करण्यात आली असून, अहवाल प्राप्त होताच कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: Bajajnagar Mamta Hospital's Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.