बजाजनगरात तीन बंद घरे चोरट्यांनी फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:57 PM2019-02-09T22:57:05+5:302019-02-09T22:57:17+5:30
वाळूज महानगर चोºयांचे सत्र सुरूच असून, शनिवारी चोरट्यांनी बजाजनगरातील तीन बंद घरेफोडल्याची घटना उघडकीस आली आहे.
वाळूज महानगर : वाळूज महानगर चोºयांचे सत्र सुरूच असून, शनिवारी चोरट्यांनी बजाजनगरातील तीन बंद घरेफोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीच्या घटनांत चोरट्यांनी जवळपास रोख रकमेसह अडीच लाखांचा ऐवज लांबविला आहे.
दोन दिवसांपूर्वीच सिडको वाळूज महानगरातील स्वप्नील कुलकर्णी यांचे घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी जवळपास २ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. ही घटना ताजी असतानाच शनिवारी बजाजनगरात पुन्हा एक घर चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली. दीपक ज्ञानदेव सरोदे (रा. शिवकृपा हौसिंग सोसायटी) हे दोन दिवसांपूर्वी घराला कुलूप लावून पत्नी व मुलासह पुण्याला नातेवाईकांकडे गेले होते. दरम्यान, त्यांचे शेजारी रावसाहेब गावंडे यांना त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले.
त्यांनी सरोदे यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. सरोदे यांनी तात्काळ घर गाठले. घरात प्रवेश करताच साहित्य अस्ताव्यस्त पडलेले व कपाट उघडे असल्याचे त्यांना दिसून आले. घरातील कपाटात ठेवलेले दोन तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच रोख ५० ते ६० हजार रुपये गायब असल्याचे दिसून आले. या चोरीची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी भेटी देऊन माहिती घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरूअसल्याचे सांगण्यात आले.
चौकट
आणखी दोन घरे फोडली
अयोध्यानगर परिसरातील ओमशक्ती हौसिंग सोसायटीत वास्तव्यास असणारे दादा अब्बू मापारी हे शुक्रवारी बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी मापारी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख २० हजार रुपये लांबविले. या सोसायटीलगत असलेल्या शांतीनिकेतन सोसायटीत सतीश वाघदरी यांच्याकडे नवीन किरायाने आलेल्या एका भाडेकरूचे घरही चोरट्यांनी साफ केले आहे. भाडेकरूगावी गेले असल्यामुळे त्यांच्या घरातून किती ऐवज चोरी गेला हे समजू शकले नाही.
चोरट्यांनी बंद घरावर मारला डल्ला
बजाजनगरातील चोरी झालेल्या तिन्ही ठिकाणचे नागरिक बाहेरगावी गेले होते. घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी या घरांवर डल्ला मारून चोरी केल्याचे समोर आले आहे. चोºयांच्या घटनांत वाढ झाल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.