बजाजनगरात दोन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:09 AM2017-08-04T01:09:01+5:302017-08-04T01:09:01+5:30

बजाजनगरातील गजबजलेल्या मोहटादेवी चौकात बुधवारी (दि.२) रात्री एक मोबाइल शॉपी व किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ५० ते ६० हजारांचा ऐवज लांबविला.

 In the Bajajnagar, two shops were closed | बजाजनगरात दोन दुकाने फोडली

बजाजनगरात दोन दुकाने फोडली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : बजाजनगरातील गजबजलेल्या मोहटादेवी चौकात बुधवारी (दि.२) रात्री एक मोबाइल शॉपी व किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ५० ते ६० हजारांचा ऐवज लांबविला. या दुकानागलगतच्या ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा चोरट्याचा प्रयत्न मात्र फसला.
बजाजनगरातील मोहटादेवी चौकातील आरती प्रोव्हिजन व गौरव मोबाइल शॉपी या दोन दुकानांचे शटर उचकटलेले असल्याचे गुरुवारी सकाळी दिसून आले. नागरिकांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती दिली. मोबाइल शॉपीचे मालक संदीप पोपट मोरे (रा. धरमपूर) यांच्या दुकानातील गल्ल्यात ठेवलेले दोन ते अडीच हजार रुपये, आठ ते दहा हजार रुपयांचे मोबाइल रिचार्ज व्हाऊचर्स, दुरुस्तीसाठी आलेले आठ ते दहा मोबाइल, असा जवळपास पन्नास ते साठ हजार रुपयांचा माल गायब असल्याचे त्यांना दिसून आले. या दुकानालगत असलेल्या राजू मिश्रा (रा. सिडको वाळूज महानगर) यांच्या किराणा दुकानातून किराणा सामान चोरट्यांनी लांबविले. राजू मिश्रा हे बाहेरगावी गेलेले असल्यामुळे त्यांचा किती माल चोरीला गेला हे समजू शकले नाही. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे फौजदार अमोल देशमुख, पोहेकॉ. कारभारी देवरे, पोहेकॉ. वसंत शेळके आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न
ही दोन्ही दुकाने फोडल्यानंतर चोरट्यांनी गुरुकृपा ज्वेलर्सचे शटरही उचकटून आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीतरी आल्याची चाहूल लागताच चोरट्यांनी पलायन केले. चोरीच्या भीतीमुळे रात्री दुकानातून किमती दागिने घरी घेऊन जात असल्याचे दुकानमालक प्रणव कांबळे यांनी सांगितले. या चोरीप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले.
डीव्हीआर लांबविला
मोबाइल शॉपीत तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेºयांमुळे आपण पकडले जाऊ, या भीतीमुळे चोरट्यांनी तिन्ही कॅमेºयांची तोडफोड करून कॅमेºयातील डीव्हीआर सोबत नेले. या चौकातील एकाही व्यावसायिकाने सीसीटीव्ही कॅमेरा लावला नसल्याचे पोलिसांंनी सांगितले. यापूर्वीही पोलिसांनी विविध व्यावसायिक व सराफांना दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचना देण्यात आली आहे. मात्र, या सूचनेकडे व्यावसायिक दुर्लक्ष करीत आहेत.

Web Title:  In the Bajajnagar, two shops were closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.