बजाजनगरात भिंतीचा वाद पुन्हा उफाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:01 PM2019-07-01T23:01:34+5:302019-07-01T23:01:45+5:30
बजाजनगरातील श्री साई मंदिर परिसरात मोकळ्या जागेवर बांधलेल्या भिंतीचा वाद दुसऱ्या दिवशी पुन्हा उफाळला आहे.
वाळूज महानगर: बजाजनगरातील श्री साई मंदिर परिसरात मोकळ्या जागेवर बांधलेल्या भिंतीचा वाद दुसऱ्या दिवशी पुन्हा उफाळला आहे. सोमवारी दुपारी रविवारच्या भांडणाच्या कारणावरुन वरुन पुन्हा दोन गटांत हाणामारी झाली. या घटनेत सहाजण जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.
सिडको अधिसूचित क्षेत्रातील गट नंबर ४८ वरील मोकळ्या जागेत बांधलेल्या भिंतीवरुन काही दिवसांपासून साई मंदिर संस्थान पदाधिकारी व सोसायटीतील नागरिकांमध्ये वाद सुरु आहे. रविवारी भिंत पाडण्याच्या कारणावरुन मंदिर संस्थान व सोसायटीतील नागरिकांत वाद होऊन तुफान दगडफेक झाली होती. यात जवळपास १२ जण जखमी झाले होते.
तसेच वाहनाचेही नुकसान झाले होते. दरम्यान, सोमवारी दुपारी पुन्हा याच कारणावरुन इंद्रप्रस्थ कॉलनीत अमोल राजुळे व उमेश महापुरे यांच्यात हाणामारी झाली. विशेष म्हणजे या घटनेत मिरची पुडीचाही वापर करण्यात आला आहे. त्यानंतर दोन्ही बाजुच्या नागरिकांत रस्त्यावरच जोरदार हाणामारी सुरु झाली. यावेळी बघ्याची गर्दी झाली मात्र, मध्यस्थीस कोणीही आली नाही. दरम्यान वाळूज एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर हा वाद शमला.
या घटनेत या अमोल राजुळे व उमेश महापुरे, सचिन सारगे, माणिक राजुळे, शोभा राजुळे व अमोलची बहिण भारती हे किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच एका दुचाकीचे (एमएच-२०, ईए- ७३३७) नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन दुचाकी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.