पुरातत्त्व विभागाने परवानगी नाकारल्यावरही देवगिरी किल्ल्यावर स्वराज्य स्तंभ उभारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 04:39 PM2024-07-26T16:39:54+5:302024-07-26T16:48:27+5:30
तगडा पोलिस बंदोबस्त पाहून बजरंग दलाने माळीवाड्यात उरकला कार्यक्रम
दौलताबाद/ छत्रपती संभाजीनगर : विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, स्वराज्य तोरण प्रतिष्ठान आदी संघटनांनी गुरुवारी दौलताबाद (देवगिरी) किल्ल्यावर आयोजित केलेल्या स्वराज्य प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाला पुरातत्त्व विभागाने परवानगी नाकारली. तरीही या संघटनांचे कार्यकर्ते सकाळी दौलताबाद परिसरात जमा होऊन स्वराज्य स्तंभ उभारणीचा प्रयत्न झाला. मात्र, तगडा पोलिस बंदोबस्त पाहून कार्यकर्ते तिथून निघून गेले आणि माळीवाड्यामध्ये कार्यक्रम उरकण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशाळगड- गजापूर घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती असल्याने पोलिसांनी दौलताबाद परिसरात मोठा बंदोबस्त लावल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. दौलताबाद किल्ल्यावर कार्यक्रमासाठी पुरातत्त्व विभाग व पोलिसांनी आधीच परवानगी नाकारली होती, तरीही सकाळी १० वाजेच्या सुमारास संजय बारगजे, भाजपचे संजय केणेकर, ह. भ. प. मेटे महाराज, श्रवण चैतन्य महाराज, सुदर्शन महाराज, नेताजी पालकर यांचे वंशज विक्रम पालकर, मनीष पाटील, राहुल भोसले, अशोक मुळे, उद्धवसेनेचे राजू शिंदे यांच्यासह ४०० हून अधिक कार्यकर्ते दौलताबादमध्ये जमा झाले. कार्यकर्त्यांनी जमावे म्हणून पाच दिवसांपूर्वी हेडगेवार रुग्णालयातील सभागृहात एक बैठकही घेण्यात आली होती. शिवभक्तांनाही या कार्यक्रमाला येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी सोशल मीडियावरून जोरदार मोहीम राबविण्यात आली होती.
कार्यकर्ते पोहोचल्यानंतर दौलताबादमधील छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. कार्यकर्त्यांसमवेत स्वराज्य तोरण प्रतिकृती होती. मात्र, पोलिसांचा बंदोबस्त पाहून हे सर्व कार्यकर्ते वाहनांनी तसेच पायी दौलताबादहून माळीवाड्यात गेले. तिथे एका हॉलमध्ये स्वराज्य तोरण सोहळा साजरा करण्यात आला. दौलताबादमध्ये थोडासा तणाव दिसला. अनेक हॉटेलचालक आणि दुकानदारांनी सकाळी आपली दुकाने बंद ठेवली होती. किल्ला परिसरातील दुकाने मात्र चालू होती.
संघटनांच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी आयोजक व पुरातत्त्व खात्याच्या पदाधिकाऱ्यांची आधीच समन्वय बैठक आयोजित केली होती. पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी तेव्हा आयोजकांना किल्ल्यावर कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकत नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर आयोजकांनी देखील सहमती दाखवत प्रशासनाला सहकार्याचे आश्वासन दिले हाेते.
तगडा पोलिस बंदोबस्त
कोणताही अनुचित प्रकार घडू नये व संरक्षण राहावे म्हणून पोलिसांचा मोठा फौज फाटा व बंदोबस्त लावण्यात आला होता. यात छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकचे उपायुक्त नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत दोन सहायक पोलिस आयुक्त, सहा पोलिस निरीक्षक, अठरा पोलिस उपनिरीक्षक, १९० पोलिस कर्मचारी, ४० महिला कर्मचारी, राज्य राखीव दलाचे २५ जवान, गुन्हे शाखेचे तसेच विशेष शाखेचे प्रत्येकी १० कर्मचारी, दामिनी पथक, दंगलविरोधी वज्र वाहन यासह इतरही काही वाहने, असा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता. ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्यावर दोन ठिकाणी तसेच किल्ल्याच्या मुख्य द्वाराजवळ व भारत माता मंदिर येथे पोलिसांचा बंदोबस्त होता.
स्वराज्य प्रेरणा स्तंभ उभारणार
दरम्यान, केंद्रीय पुरातत्त्व आणि राज्य शासन पुरातत्त्व विभागाची परवानगी घेऊन किल्ला परिसरात स्वराज्य प्रेरणा स्तंभ परिसरात उभारण्यात येणार असल्याची माहिती संयोजक राहुल भोसले व विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांतप्रमुख संजय बारगजे यांनी दिली.
खबरदारी म्हणून बंदोबस्त
विशाळगड- गजापूर येथील घटना आणि विभागीय आयुक्त कार्यालयावर एमआयएमतर्फे आयोजित निदर्शनाच्या वेळी झालेली गडबड या गोष्टी लक्षात घेऊन या कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वीच समन्वय बैठक घेऊन आयोजकांशी आम्ही संवाद साधला होता. तेव्हाच आयोजकांनी सहकार्याचे आश्वासन दिले होते.
- नितीन बगाटे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १.
स्वराज्य प्रेरणा दिन आताच कशासाठी?
प्रश्न : स्वराज्य प्रेरणा दिन आयोजनाचा उद्देश काय?
मनीष पाटील (संयोजक) : देवगिरी किल्ल्यावर २५ जुलै १६२९ विश्वासघाताने लखुजीराजे जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली; पण या घटनेचा विसर पडला आहे. हा खरा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा, यासाठी स्वराज्य प्रेरणा दिनाचे आयोजन केले होते. कोणताही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न नव्हता.
प्रश्न : या दिनाचे आयोजन आताच का केले गेले?
मनीष पाटील : लखुजीराजे जाधव यांच्याविषयी आजही लोकांना माहिती नाही. गाइडदेखील हा इतिहास सांगत नाही. त्यांच्याविषयी लोकांपर्यंत माहिती पोहोचावी, हाच हेतू आहे. त्यासाठी गेल्या ६ महिन्यांपासून तयारी करीत होतो.
प्रश्न : देवगिरी किल्ल्यावर या दिनाचे नियोजन होते; परंतु तसे झाले नाही ?
मनीष पाटील : देवगिरी किल्ल्यावर स्वराज्य प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार होता. मात्र, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने परवानगी नाकारली. त्यामुळे एका मंगल कार्यालयात हा कार्यक्रम घ्यावा लागला.
प्रश्न : सरकारकडे काही मागणी केली आहे का?
मनीष पाटील : पुढच्या वर्षी देवगिरी किल्ल्यावर हा स्वराज्य प्रेरणा दिन साजरा करण्याचा प्रयत्न करू, तसेच देवगिरी किल्ल्यावर ‘स्वराज्य प्रेरणा स्तंभ’ उभारण्यासाठी प्रयत्न केला जाईल. नाही तर ग्रामस्थांच्या माध्यमातून जागा मिळाली तर तेथे हा स्तंभ साकारू.