‘बाळासाहेब पवार हे खरे सहकारव्रती; शिक्षणव्रती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:57 AM2018-04-22T00:57:04+5:302018-04-22T00:59:36+5:30
बाळासाहेब पवार आध्यात्मिक, धार्मिक वृत्तीचे होते. मात्र, सनातनी नव्हते. त्यांनी संस्कृती-परंपरा जोपासली होती. अनेक साधू-संतांची पूजा केली; पण ते खरे ‘सेक्युलर’ होते. त्यांच्यात ढोंगीपणा नव्हता. ते जाती व धर्मभेद करणारे नव्हते. सहकारमहर्षी वा शिक्षणमहर्षी असणे वाईट नाही; परंतु बाळासाहेब पवार हे खरे सहकारव्रती होते व खरे शिक्षणव्रती होते. मराठवाड्याच्या न्याय्य हक्कांसाठी ते सतत निर्भीडपणे लढत राहिले. मराठवाड्याच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. नव्या पिढीला अशा या बाळासाहेब पवारांपासून सतत प्रेरणा मिळत राहील, असे उद्गार आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बाळासाहेब पवार आध्यात्मिक, धार्मिक वृत्तीचे होते. मात्र, सनातनी नव्हते. त्यांनी संस्कृती-परंपरा जोपासली होती. अनेक साधू-संतांची पूजा केली; पण ते खरे ‘सेक्युलर’ होते. त्यांच्यात ढोंगीपणा नव्हता. ते जाती व धर्मभेद करणारे नव्हते. सहकारमहर्षी वा शिक्षणमहर्षी असणे वाईट नाही; परंतु बाळासाहेब पवार हे खरे सहकारव्रती होते व खरे शिक्षणव्रती होते. मराठवाड्याच्या न्याय्य हक्कांसाठी ते सतत निर्भीडपणे लढत राहिले. मराठवाड्याच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. नव्या पिढीला अशा या बाळासाहेब पवारांपासून सतत प्रेरणा मिळत राहील, असे उद्गार आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
जगद्गुरू तुकाराम महाराज नाट्यगृहात ते ‘ नीतिधुरंधर: बाळासाहेब पवार’ या महावीर जोंधळे लिखित चरित्रगं्रथाचे प्रकाशन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री जयंतराव पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, खा. चंद्रकांत खैरे, ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांची यावेळी भाषणे झाली. लेखक जोंधळे यांनी प्रास्ताविक केले.
ते व्रतस्थ जीवन जगले....
देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाळासाहेब पवार यांचा माझा वैयक्तिक परिचय नव्हता; परंतु औरंगाबाद-जालना जिल्ह्यांत त्यांचा वारंवार उल्लेख ऐकायला मिळतो. हरिभाऊ बागडे यांच्या तोंडून तर बाळासाहेबांचे नाव मी सतत ऐकत असतो.
पुस्तक वाचल्यानंतर या माणसाची उंची काय होती, याची कल्पना येते. अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती न सोडता, स्वत:साठी न जगता, बाळासाहेबांनी नेतृत्वाची एक फळी तयार केली. ते व्रतस्थ जीवन जगले. ते मुख्यमंत्री हटवण्याचे काम करीत होते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. ते मुख्यमंत्री कसा असावा, नवा मुख्यमंत्री कोण असावा हे ठरवीत होते व त्यासाठी संघर्ष करीत होते.
संघर्षातही बाळासाहेब पवार यांचा संयम ढळत नव्हता, हा पैलूही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केला. बाळासाहेब पवार हे विलक्षण व अलौकिक लोकनेते होते. मराठवाड्यावर सातत्याने अन्याय झाला, ही खंत उराशी बाळगून ते त्याविरुद्ध लढत राहिले. अनेक सहकारी साखर कारखाने उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला, हे सुरेश प्रभू यांनी नमूद केले. रावसाहेब दानवे यांनी बाळासाहेबांचे माझ्यावर कसे प्रेम होते, हे सांगितले व मी काँग्रेसमध्ये यावा यासाठी कसे कसे प्रयत्न केले, यावरही प्रकाश टाकला. विश्वनाथ दाशरथे यांनी गायलेल्या वैष्णव जन तो तेणे कहिए या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली व शेवटी जे का रंजले गांजले या भजनाने शेवट झाला. मानसिंग पवार, अजय शहा, किशोर शितोळे, प्रफुल्ल मालानी, जगन्नाथ काळे, आदेशपालसिंह छाबडा, दयाराम बसैय्ये, सुरेश वाकडे, प्रमोद खैरनार व विवेक जैस्वाल आदींनी तुकोबाची पगडी देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. रूपेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले.
जयंतराव पाटील हे मुख्यमंत्र्यांकडे बघत म्हणाले, बाळासाहेब पवार यांचा मुख्यमंत्री हटवण्यात हातखंडा होता. आज ते हयात नाहीत. ( हंशा)
रावसाहेब दानवे यावर कोटी न करतील तर नवल! व्यासपीठावर बसलेले जयंत पाटील व विखे पाटील यांच्याकडे बघत ते म्हणाले, बाळासाहेब पवार यांच्यासारखे तुम्ही दोन दोन जण असून काहीही उपयोग नाही. फडणवीस उत्तम काम करीत आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र यावर एवढे म्हटले की, बाळासाहेब पवार हे मुख्यमंत्री हटवणारे म्हणणे चुकीचे आहे, तर ते नवा मुख्यमंत्री कसा असावा, असा आग्रह धरणारे होते.