Video: बाळासाहेबांचा धाक आजही, उद्धव ठाकरेंना मीच घाबरत नाही, इतरांच काय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 16:06 IST2022-10-21T16:04:58+5:302022-10-21T16:06:56+5:30
'उद्धव ठाकरेंना घाबरत नसल्यानेच आज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे'

Video: बाळासाहेबांचा धाक आजही, उद्धव ठाकरेंना मीच घाबरत नाही, इतरांच काय...
औरंगाबाद: बाळासाहेबांचा धाक सर्वांना होता. पण उद्धव ठाकरेंचा नाही. मी काँग्रेस मध्ये असताना सुद्धा बाळासाहेबांचा दरारा होता. पण उद्धव ठाकरे यांना मीच घाबरत नाही, इतरांच काय ते ओळखून घ्या. उद्धव ठाकरेंना घाबरत नसल्यानेच आज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, असा टोला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला.
माध्यम प्रतिनिधींसोबत वार्तालाप करताना अब्दुल सत्तार पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे मुलुख मैदानी तोफ होते. राज्यातील सर्व पक्षातील नेत्यांना त्यांचा धाक होता. आजच्या सत्तेतील आणि विरोधातील सर्वांना त्यांची भीती होती. मी कॉंग्रेसमध्ये असताना देखील त्यांची भीती होती. औरंगाबादमध्ये बाळासाहेबांची सभा असताना त्याचा अनुभव नेहमी येत होती. आज उद्धव ठाकरेंच्या बाबत ही परिस्थिती नाही. त्यांचा धाक असता तर ४० आमदार, १२ खासदार आणि लाखो शिवसैनिक सोडून गेले नसते. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदी बसवले. पण शिवसैनिकांना न्याय मिळत नव्हता. शिवसैनिकांवर तडीपार सारख्या कारवाई होत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आम्ही इकडे आलो, असेही सत्तार यावेळी म्हणाले.
संपूर्ण राज्याचा दौरा करणार, १५ दिवसांत पंचनामा
मी स्वतः सगळीकडे दौरा करणार असून, एकही शेतकरी भरपाई पासुन वंचित राहणार नाही. तसेच येत्या 15 दिवसांत पंचनामे होतील अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलीय. मका, कापूस सोयाबीन नुकसान झालंय, कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भावना समजून घेत आहेत. अनेक जिल्ह्यात ढगफुटी, पावसाने नुकसान केले आहे. पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे हा पर्याय नाही. पंचनामे करण्यासाठी सॅटेलाईट पाहणी पद्धत तयार करतोय. भविष्यातील अडचणी यातून दूर होतील. मात्र, यावेळेस ग्राउंडवर जाऊनच पंचनामे करावे लागतील असेही कृषीमंत्री सत्तार म्हणाले.