बालभारती खडबडून जागी झाली; पाने वेगळी झालेली पुस्तके परत घेणार, नवीन देणार
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 20, 2023 02:12 PM2023-06-20T14:12:48+5:302023-06-20T14:13:20+5:30
पुस्तकाला पिना मारलेल्या नाहीत फक्त ‘ग्लू’ वापरुन चिटकविण्यात आले आहे. यामुळे पुस्तक फाटणारच, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.
छत्रपती संभाजीनगर : बालभारतीची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची पुस्तके अनुदानित शाळांना मोफत वाटप करण्यात आली. पण ; पाठ्यपुस्तकाची बांधणी (बायंडिंग) व्यवस्थित न झाल्याने पुस्तकाची पाने वेगवेगळी निघत आहेत, अशी बातमी ‘लोकमत’ने उजेडात आणली. यानंतर बालभारती (पाठ्यपुस्तक मंडळ) खडबडून जागी झाली आहे. पुस्तके विद्यार्थ्यांकडून शाळांनी परत घ्यावीत व पाठ्यपुस्तक मंडळात आणून द्यावी, त्याबदलात नवीन पुस्तक देण्यात येतील, अशा सूचना पाठ्यपुस्तक मंडळाचे सहायक भांडार व्यवस्थापक सुभाष पवार यांनी केल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने यंदा ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ या पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून इयत्ता ‘पहिली ते सातवी’ ची पुस्तक शाळांना वाटप केली आहे. सर्व विषय समावेश असलेल्या या पुस्तकांची बांधणी व्यवस्थित झाली नाही. त्यातील अनेक पुस्तकांची पाने निघू लागली. याविषयावर सोमवारच्या (दि.१९) लोकमतच्या हॅलो संभाजीनगर अंकात ‘ पुस्तकांना सहन होईना पानांचे वजन’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल मंडळाच्या पुण्यातील संचालक कार्यालयाने घेतली. आणि शहरातील बालभारतीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पुस्तकांची तपासणी सुरु केली. भांडारामध्ये जे पुस्तक होते त्यात बांधणी अचृूक होती (बायंडिंग मिस्टेक) दिसून आली नाही. नंतर अधिकाऱ्यांनी शहरातील होलसेल व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन पुस्तकांची तपासणी केली.
अजून पालकांच्या तक्रारी आल्या नसल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले पण पुस्तकाला पिना मारलेल्या नाहीत फक्त ‘ग्लू’ वापरुन चिटकविण्यात आले आहे. यामुळे पुस्तक फाटणारच, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले. काही शाळेत विद्यार्थ्यांनी तक्रार केल्या पण अजून शाळांनी पाठ्यपुस्तक मंडळाकडे या संदर्भात माहिती दिली नसल्याचे आढळून आले आहे. पाठपुस्तक फाटले असेल तर विद्यार्थ्यांना घरीच चिटकवा असा, सल्ला शिक्षकांनी देऊ नये, ती सर्व पुस्तके जमा करुन रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील ‘बालभारती’च्या भांडारात आणून द्यावीत. ती बदलून देण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.
विकत घेतलेली पुस्तके दुकानदारांना परत करा
बालभारतीच्या पुस्तक बांधणीत त्रुटी असतील (बायंडिंग मिस्टेक) झाली असेल व ही पुस्तके विक्रेत्यांकडून खरेदी केली असेल तर ती पुस्तके त्या संबंधित विक्रेत्याला परत करावी. विक्रेते पाठ्यपुस्तक मंडळाच्या भांडारात देतील व तिथे त्यांना नवीन पुस्तक दिले जाईल व विक्रेते ती नवीन पुस्तके ग्राहकांना देतील, अशी माहिती सहायक भांडार व्यवस्थापकाने दिली आहे.