‘बळीराजा दे वचन आम्हास...’; लाडक्या 'संजा' बैलास श्रद्धांजली, शेतकऱ्यांस केले आवाहन 

By प्रशांत तेलवाडकर | Published: September 15, 2023 04:36 PM2023-09-15T16:36:36+5:302023-09-15T16:37:21+5:30

डीजेच्या तालावर सर्जा-राजासमोर नाचले गावकरी

'Baliraja promise us...'; Tribute to the beloved 'Sanja' bull, appealed to the farmers | ‘बळीराजा दे वचन आम्हास...’; लाडक्या 'संजा' बैलास श्रद्धांजली, शेतकऱ्यांस केले आवाहन 

‘बळीराजा दे वचन आम्हास...’; लाडक्या 'संजा' बैलास श्रद्धांजली, शेतकऱ्यांस केले आवाहन 

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : ‘मानाची जोडी पोळ्यात भारी’, ‘मान बैलाचा सण पोळ्याचा’, ‘नाद एकच बैलगाडा शर्यत’, असे गाणे डीजेवर वाजत होते आणि सजविलेल्या ‘सर्जा-राजा’समोर चिकलठाणकर नृत्य करत होते. हे दृश्य बघण्यासाठी हजारो गावकरी जमले होते तर एसटी बस, कंपन्यांच्या बसमधून जाणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांनादेखील या बैलजोड्यांच्या मिरवणुकीला आपल्या मोबाइलमध्ये बंदिस्त करण्याचा मोह आवरला नाही.
वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलजोडीच्या श्रमाचा गौरव करणारा ‘पोळा’ सण गुरूवारी सर्वत्र साजरा करण्यात आला. शहरात मातीचे, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बैल जोडी खरेदी करून घरोघरी पुजले गेले. तर ग्रामीण बाज टिकून ठेवलेल्या चिकलठाण्यात गुरूवारी पोळ्याचा मोठा उत्साह होता.

येथील चौधरी कॉलनीच्या मैदानात परिसरातील ३८ बैलजोड्यांना आणण्यात आले होते. आकर्षकपणे त्यांना सजविण्यात आले होते. काहींच्या शिंगावर देवदेवतांचे फोटो लावण्यात आले होते. वाघ्या मुरळीच्या गाण्यावर नागरिक नृत्य करत होते तर कोणी डीजेच्या ठेक्यावर नृत्य करत होते. चिकलठाणाच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक पुढे-पुढे सरकत होती. तसतशी बघणाऱ्यांची गर्दी वाढत होती. वाजत-गाजत बैलजोड्यांना हनुमान चौक येथील पावन हनुमान मंदिराच्या दरवाजासमोर नेण्यात आले. तिथे पायरीवर बैलांना डोके टेकवून त्यांना घरी नेण्यात आले. दुपारी ३:३० वाजता सुरू झालेला उत्साह रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होता. लम्पीच्या रोगामुळे सरकारने मिरवणूक न काढण्याच्या आवाहनाला हर्सूलकरांनी प्रतिसाद देत मोठी मिरवूणक काढणे टाळले.

‘दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा’
चिकलठाण्यात एका पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘घरचा साज... संजा यास भावपूर्ण श्रद्धांजली’ असे छापण्यात आले होते. मरण पावलेल्या ‘संजा’ नावाच्या बैलाचा फोटोही त्याच्या मालकाने पोस्टरवर छापून श्रद्धांजली वाहिली होती. तसेच ‘नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा, दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा’ या ओळीही वाचून अनेकांचे मन भरून येत होते.

Web Title: 'Baliraja promise us...'; Tribute to the beloved 'Sanja' bull, appealed to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.