बोल्डा फाटा येथे मटका अड्ड्यावर धाड
By Admin | Published: May 23, 2016 11:38 PM2016-05-23T23:38:51+5:302016-05-24T01:04:45+5:30
आखाडा बाळापूर : अप्पर पोलिस अधीक्षकांनी तयार केलेल्या सापोनि बाचेवाड यांच्या विशेष पथकाने २३ मे रोजी दुपार १२. ३० वाजण्याच्या सुमारास बोल्डाफाटा येथील मटका अड्ड्यावर धाड टाकली
आखाडा बाळापूर : अप्पर पोलिस अधीक्षकांनी तयार केलेल्या सापोनि बाचेवाड यांच्या विशेष पथकाने २३ मे रोजी दुपार १२. ३० वाजण्याच्या सुमारास बोल्डाफाटा येथील मटका अड्ड्यावर धाड टाकली. मटक्याचे साहित्य , रोख रक्कम ८ हजार ६१० रुपये, मोबाईल जप्त केले असून, मटका खेळविणाऱ्यांसह चौघांना अटक केली आहे.
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूरसह दांडेगाव, बोल्डा, येहळेगाव या भागात गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे मटका सुरु आहे. पोलिसांनी या अवैध धंद्यांना सहमती असल्याची चर्चा जोरात सुरु होती. पण पोलिस अधीक्षकांच्या बदलीनंतर पोलिसांची भूमिका बदलल्याचे दिसते. अप्पर पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये सापोनि जी. पी. बाचेवाड, सोपान लिंबेकर, पो. शि. नवनाथ शिंदे, कांबळे, महादू शिंदे, अशोक काकडे यांच्या विशेष पथकाने साध्या वेशात दुचाकीने बोल्डा फाटा येथे २३ मे रोजी सकाळी ११. ३० वाजता पोहोचले. साध्या वेशातील पोलिसांनी मटका अड्ड्यावर सापळा रचून धाड घातली. यात मटका खळविणाऱ्यांकडून मटक्याचे साहित्य व रोख ५ हजार २८० रुपये तर तेथे मटका खेळणाऱ्यांकडून २ हजार ३३० रुपये व चार मोबाईल जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई सोपान लिंबेकर यांच्या फिर्यादीवरुन मटका खेळविणारा शेख दस्तगीर शेख अजीज, मटका खेळणारे रामेश्वर विनकर, सखाराम विनकर, अमोल मंदाडे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण कल्याण मिलन, मॉर्निंग बाजार, नावाचा मटका खेळतांना व खेळवितांना आढळून आल्याने त्यांना अटक केली आहे. पुढील तपास बीट जमादार बी. डी. मिजगर करीत आहेत. (वार्ताहर)