बळसोंडचा पाणीप्रश्न बनला गंभीर
By Admin | Published: February 17, 2016 10:50 PM2016-02-17T22:50:24+5:302016-02-17T22:58:40+5:30
हिंगोली : शहरानजीकच्या बळसोंड भागातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. या भागात खाजगी टँकर विकत घेवून नागरिकांना पाणी पिण्याची वेळ आली आहे.
हिंगोली : शहरानजीकच्या बळसोंड भागातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. या भागात खाजगी टँकर विकत घेवून नागरिकांना पाणी पिण्याची वेळ आली आहे. प्रशासनाकडे उपाययोजनांचे प्रस्ताव पाठवूनही अद्याप दखल घेतली गेली नाही.
हिंगोलीला लागूनच असलेल्या जवळपास दहा हजारांवर लोकसंख्या असलेल्या या गावात यापूर्वी जलस्वराज्य प्रकल्पात योजना मंजूर झाली होती. परंतु तिचे तेव्हाच तीनतेरा वाजले आहेत. त्यात अपहाराचे गुन्हेही दाखल झाले. त्यानंतर नवीन योजनेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आता नव्यानेच जीवन प्राधिकरणने सर्वेक्षण करून ९ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले. ते मंजुरीसाठी मंत्रालयात गेले आहे. त्याचे कोडे सुटेल तेव्हा सुटेल मात्र तूर्त या गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. अनेकांना खाजगी टँकरचे पाणी घेतल्याशिवाय तरणोपाय उरला नाही. यात मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. अनेकांचे गृहबजेट यात कोलमडले आहे. शिवाय टँकरही वेळेवर मिळत नसल्याने चाकरमान्यांची कामे खोळंबून पडत आहेत. हा प्रकार नित्याचा झाला. (जिल्हा प्रतिनिधी)