भामट्यांनी २ तोळ्यांचे मंगळसूत्र लांबविले
By Admin | Published: October 22, 2014 12:23 AM2014-10-22T00:23:39+5:302014-10-22T01:20:00+5:30
वाळूज महानगर : दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना काल दुपारी घडली.
वाळूज महानगर : दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना काल दुपारी बजाजनगरात घडली. मंगळसूत्र हिसकावून पसार झालेले भामटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
राजश्री गोविंद उगले (२७, रा. करमाड) या काल २० आॅक्टोबरला बजाजनगरातील नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. काल दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास राजश्री या त्यांची जाऊ कांचन यांच्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी घराबाहेर पडल्या. मुलाला शाळेतून सोबत घेतल्यानंतर घरी परतत असताना विनाक्रमांकाच्या निळ्या रंगाच्या दुचाकीवरून सुसाट वेगाने आलेल्या २२ ते २५ वयोगटातील दोन भामट्यांनी गाडीचा वेग कमी केला. यावेळी पाठीमागे काळा शर्ट परिधान करून बसलेल्या चोराने क्षणार्धात राजश्री यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. दोन्ही भामटे सुसाट वेगाने आंबेडकर चौकाच्या दिशेने पसार झाले. या अनपेक्षित प्रकारामुळे राजश्री व कांचन यांनी आरडाओरड केल्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दोघेही भामटे पसार झाले होते. राजश्री उगले यांनी सायंकाळी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबविल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास फौजदार व्ही.एस. जाधव करीत आहेत.