रमजाननिम्मित औरंगाबादेत बनतो 'बम्बय्या' हलवा पराठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 02:19 PM2018-06-14T14:19:06+5:302018-06-14T14:25:06+5:30

मुंबईचा ‘स्पेशल’ असणारा हा हलवा पराठा औरंगाबादकरांना खाऊ घालण्यासाठी शेफ कुर्शीद शेख खास मुंबईहून दरवर्षी रमजान महिन्यात औरंगाबादेत येतात.

'Bambayya' Halwa Paratha made in Aurangabad for Ramzan | रमजाननिम्मित औरंगाबादेत बनतो 'बम्बय्या' हलवा पराठा

रमजाननिम्मित औरंगाबादेत बनतो 'बम्बय्या' हलवा पराठा

googlenewsNext

- ऋचिका पालोदकर

औरंगाबाद : पराठा म्हटल्यावर सहजपणे डोळ्यासमोर येतो त्या आकाराच्या कित्येकपट मोठा, अगदी परातही छोटी दिसेल एवढा मोठा पराठा कुर्शीद शेख आपल्या हातांची लयबद्ध हालचाल करीत बनवतात. मग भल्या मोठ्या कढईत तापलेल्या तेलात तो हळुवारपणे सोडतात. चर्र आवाज करीत पराठा तेलाशी सामना करतो आणि त्याच्या सुवासाने खवय्यांच्या तोंडाला अक्षरश: पाणी सुटते.

मुंबईचा ‘स्पेशल’ असणारा हा हलवा पराठा औरंगाबादकरांना खाऊ घालण्यासाठी शेफ कुर्शीद शेख खास मुंबईहून दरवर्षी रमजान महिन्यात औरंगाबादेत येतात. मागील आठ वर्षांपासून ते येथील खवय्यांना हा पराठा खाऊ घालून संतुष्ट करीत आहेत.हलवा पराठा म्हणजे पाणी, तेल, मीठ आणि मैदा यापासून बनविलेला पराठा आणि साखर, रवा, तूप आणि खवा यापासून बनविलेला हलवा होय. रमजानमध्ये दररोज वीस किलो मैदा आणि तीन ते चार किलो रवा एवढे साहित्य वापरून बनविलेला हलवा पराठा चालता-बोलता संपून जातो, असे कुर्शीद यांनी सांगितले.

मीठ, मैदा आणि पाणी हे पदार्थ एकमेकांत मिसळून हा पदार्थ बनविण्यास सुरुवात होते. हे पदार्थ कसे मळले जातात आणि एकमेकांमध्ये किती पद्धतशीरपणे सामावले जातात, यावर पराठ्याचे ताणले जाणे अवलंबून असते. त्यामुळे कुर्शीद  पाऊण ते एक तास मेहनत घेऊन हे मिश्रण मळतात. यावेळी घामाने थपथपलेल्या कुर्शीद यांना पाहणे म्हणजेच हा पदार्थ किती लज्जतदार होणार याची झलक  ठरते. या मिश्रणापासून त्यांनी अंदाजे एक ते सव्वा किलो वजनाचे लोण्यासारखे मऊसूत गोळे बनविले.

हे गोळे बनविताना मातीचा घट उलटा पकडून हातात खेळवावा, तशा पद्धतीने कुर्शीद गोळा एका हातातून दुसºया हातात नाचवत होते. हालचालीतली ही सुसूत्रता पाहणेही रंजकदार ठरले. असे कित्येक गोळे बनवून त्यांनी त्यावर तेल शिंपडले आणि लहान बाळाला पावडर लावावी त्याप्रमाणे गोळ्यांवर हळुवार हात फिरवून ते पसरवले.

ओल्या कपड्याखाली सर्व गोळे झाकून ठेवले आणि तासाभराने गोळा या हातावरून त्या हातावर ताणत त्यांनी पराठा पसरविण्यास सुरुवात केली. हातांची ही नजाकतपूर्ण हालचाल पाहून नृत्य सुरू असल्याचा भास होतो. हा भलामोठा पराठा नंतर तळला जातो.पराठ्यांचा हा खेळ सुरू असेपर्यंत त्यांचे साथीदार अस्सल तूप, खवा, रवा यापासून हलवा तयार करतात. त्यात टाकलेला केशरी रंग आणि तुपामुळे आलेली चमक यामुळे हा हलवा अधिकच खुलून दिसतो. सुकामेवा, खोबरे, खजूर आणि चेरी यांचा वापर करून सुशोभित केलेला हा हलवा खवय्ये पराठ्यासोबत चाखतात आणि डोळे मिटून तोंडभर पसरलेल्या या सुखद चवीचा अनुभव घेतात.

 

Web Title: 'Bambayya' Halwa Paratha made in Aurangabad for Ramzan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.