घरच्या घरीच बादलीमध्ये करा सेंद्रिय खत निर्मिती !
By Admin | Published: October 5, 2016 12:58 AM2016-10-05T00:58:41+5:302016-10-05T01:15:57+5:30
औरंगाबाद : स्वयंपाकघरात रोजच्या रोज तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, हा प्रश्न तमाम महिलांना कायम पडलेला असतो.
औरंगाबाद : स्वयंपाकघरात रोजच्या रोज तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, हा प्रश्न तमाम महिलांना कायम पडलेला असतो. रोज जमा होणारा हा कचरा फेकून देण्यापेक्षा या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास योग्य प्रकारे उपयोगात येऊ शकतो. हाच विचार करून शक्ती कॅनॉट महिला मंडळाच्या वतीने घरगुती सेंद्रिय खत निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
जटवाड्याचे ग्रामविकास प्रमुख कैलास राठोड यांनी महिलांना कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रशिक्षण दिले. ही खत निर्मितीची प्रक्रिया अत्यंत सोपी असून यामुळे साध्या प्लास्टिकच्या बादलीतही खतनिर्मिती करणे शक्य झाले आहे. फळांच्या साली, भाज्यांच्या काड्या, देठे, उरलेले अन्न, सुकलेली फुले, झाडांचा पालापाचोळा अशा प्रकारच्या कचऱ्याचा खतनिर्मितीसाठी वापर होऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर खतनिर्मिती करायची असल्यास बादलीऐवजी बागेमध्ये खड्डा करून त्या खड्ड्याचा वापर करता येतो.
किरण काळे, रेखा सोनुने यांनी या कार्यशाळेसाठी विशेष मेहनत घेतली. सूरज बडग, अक्षय तोरणे, शक्ती कॅनॉट महिला मंडळाच्या सदस्या तसेच अध्यक्षा स्वाती स्मार्त यांची उपस्थिती होती.