प्रियकराने जातीमुळे लग्नास नकार दिला, बीएएमएसच्या विद्यार्थिनीने तलावात जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 02:00 PM2024-08-24T14:00:51+5:302024-08-24T14:02:42+5:30
गुन्हा दाखल होताच सिटीचौक पाेलिसांकडून प्रियकराला काही तासांत अटक
छत्रपती संभाजीनगर : सलीमअली तलावात सापडलेला मृतदेह अपूर्वा दिलीप गजहंस (२१) हिचा असल्याचे शुक्रवारी निष्पन्न झाले. प्रियकराकडून होत असलेला छळ व जातीमुळे संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या तणावातून तिने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी प्रियकर किरण कांबळे याला सिटीचौक पोलिसांनी तत्काळ अटक केली.
अपूर्वाच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. ती आई, भाऊ व दाेन बहिणींसह पडेगाव परिसरात राहते. संगमनेरच्या अश्विन रुरल आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षाची ती विद्यार्थिनी होती. १७ ऑगस्ट रोजी राखी पोर्णिमेनिमित्त ती घरी आली होती. २० ऑगस्ट राेजी दुपारी १२ वाजता मैत्रिणीच्या भेटीचे कारण सांगून ती घराबाहेर पडली. दुपारी १:३० वाजता तिची मैत्रीण ईशाने अपूर्वाच्या आईला संपर्क करून अपूर्वा व किरणमध्ये वाद झाले आहेत. अपूर्वा तणावात असून एसबी महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये बसल्याचे सांगितले. तिला लवकर घरी घेऊन जाण्याबाबत ईशाने तिच्या आईला कळवले होते. घरून बोलावणे आल्याने ईशा चालल्या गेली. अपूर्वाच्या बहिणींनी धाव घेतली. मात्र, ती मिळून आली नाही.
गुरुवारी सलीम अली तलावात तरुणीचा मृतदेह आढळला. पोलिसांकडून शोध सुरू असताना छावणी पोलिस ठाण्यात दाखल बेपत्ता तरुणीचे वर्णन जुळल्यानंतर अपूर्वाच्या कुटुंबाला संपर्क करण्यात आला. तिच्या मामाने घाटीत जाऊन खात्री केली.
अपूर्वाची आई आशा यांनी सिटीचौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. किरणच्या प्रेमसंबंधाबाबत अपूर्वाने त्यांना २ महिन्यांपूर्वी सांगितले होते. आशा यांच्याकडे देखील किरण त्याची कबुली दिली होती; परंतु जात वेगळी असल्याने किरणने भविष्यात लग्न करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे आशा यांनी त्याला अपूर्वासोबतचे संबंधही थांबवण्यास सांगितले, तरीही किरण वारंवार संपर्क करत होता. २० ऑगस्ट रोजीदेखील त्याने तिला भेटायला बोलावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. उपनिरीक्षक अजित दगडखैर यांनी तत्काळ किरणचा शोध घेऊन त्याला अटक केली.