परीक्षा विभागाचे 'सर्जिकल स्ट्राईक', परीक्षेपूर्वीच संस्थाचालकाच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेची प्रत
By राम शिनगारे | Published: April 13, 2024 07:16 PM2024-04-13T19:16:28+5:302024-04-13T19:17:20+5:30
परीक्षा केंद्रातील अनेकांचे मोबाईल जप्त करून पथकाने विद्यापीठात आणले.
छत्रपती संभाजीनगर : रांजणगावातील एका महाविद्यालयाच्या केंद्रातील स्ट्राँगरूममधून परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका संस्थाचालकाच्या मोबाईलवर पाठविण्यात येत होत्या, तर कन्नड तालुक्यातील एका केंद्रातील कर्मचारी इतर मित्रांना प्रश्नपत्रिका पाठवीत असल्याची माहिती परीक्षा विभागाच्या गोपनीय टीमने उघडकीस आणली. त्यानंतर कुलगुरूंच्या आदेशानुसार दोन प्राध्यापकांनी संबंधित केंद्रांवर 'सर्जिकल स्ट्राईक' करीत संपूर्ण प्रकार रंगेहाथ पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रांजणगाव येथील गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २ एप्रिलपासून पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातून सकाळी ८ आठ वाजता संंबंधित केंद्रावर प्रश्नपत्रिका पाठविण्यात येत होती. मात्र, या केंद्रातील स्ट्राँगरूममधील कर्मचारी प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच संस्थाचालकांच्या मोबाईलवर पाठवीत होता. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात प्रश्नपत्रिकांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी असलेल्या गोपनीय टीमच्या निदर्शनास हा प्रकार ८ एप्रिल रोजी आला. अधिक तांत्रिक माहिती जमा करून अहवाल कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडे सोपविण्यात आला.
डॉ. फुलारी यांनी विश्वासातील दोन प्राध्यापकांना सर्जिकल स्ट्राईकच्या मोहिमेवर पाठविले. हे पथक सुरुवातीला रांजणगावातील केंद्रावर पोहोचले. त्याठिकाणी स्ट्राँगरूममधील कर्मचाऱ्याचा मोबाईल जप्त करीत पाहणी केली. तेव्हा त्यातून धक्कादायक माहिती उघडकीस आली. त्या मोबाईलवरून संस्थाचालकासह इतरांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका पाठविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. त्याशिवाय इतर काही लोकांचे मोबाईल जप्त केले. त्यांच्याही मोबाईलच्या डाटात अनेक प्रश्नपत्रिका आढळून आल्या. ही मोहीम फत्ते झाल्यानंतर कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथील पद्मावती कला महाविद्यालयाच्या केंद्रावर पथक पोहोचले. त्याठिकाणीही एका लिपिकाच्या मोबाईलमध्ये परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या ठिकाणचेही अनेकांचे मोबाईल जप्त करून पथकाने विद्यापीठात आणले. दरम्यान, गुरुकुल महाविद्यालयाच्या संस्थाचालकाशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
दोन्ही परीक्षा केंद्रे बदलली
१० एप्रिल रोजी ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्यानंतर गुरुवारी सुटी होती. त्यामुळे १२ एप्रिल रोजी परीक्षेतील गैरप्रकारावर कारवाई करणारी विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार ४८ (५) क समितीची बैठक विद्यापीठात घेण्यात आली. त्या बैठकीत दोन्ही केंद्रांच्या प्रमुख, सहकेंद्रप्रमुखांकडून खुलासा घेतला. त्यानंतर दोन्ही केंद्रे १३ एप्रिलपासून बदलण्यात आली. रांजणगावच्या गुरुकुल महाविद्यालयाऐवजी दगडोजीराव देशमुख कला महाविद्यालय आणि पद्मावती महाविद्यालयाऐवजी एच. बी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, पिशोर हे केंद्र देण्यात आले आहे.
परीक्षा विभागाची करडी नजर
मागील परीक्षेच्या वेळी परळी येथील केंद्रात गैरप्रकार झाला होता. तेव्हापासून परीक्षा विभागाने गोपनीयतेसंदर्भातील काही फिचर वाढविले होते. या माध्यमातून सर्व केंद्रांवर परीक्षा विभागाची नजर ठेवली जात होती. त्यात दोन केंद्रांवर काही गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास येताच कारवाई करण्यात आली. या ठिकाणचे केंद्र बदलले असून, पुढील कारवाई नियमानुसार केली जाणार आहे.
-डॉ. भारती गवळी, संचालक, परीक्षा विभाग.
...तर गुन्हे नोंदविणार
महाविद्यालयात लिपिक परीक्षेच्या कामात काही गैरप्रकार करीत असल्याचे समजल्यानंतर धक्काच बसला. या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित लिपिकास निलंबित केले. तसेच विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार संबंधितांवर गुन्हेही नोंदविण्यात येतील.
- संतोष साळवे, अध्यक्ष, पद्मावती कला महाविद्यालय, अमदाबाद