'टॉप फाइव्ह' मुलाखतीनंतर कुलगुरूंची घोषणा होईना; दोघांची रस्सीखेच, तिसराच बाजी मारणार?
By राम शिनगारे | Published: January 11, 2024 08:06 PM2024-01-11T20:06:59+5:302024-01-11T20:08:21+5:30
विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी सहा महिन्यांपूर्वी प्रक्रियेला सुरुवात झाली होती.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी ४ जानेवारी रोजी 'टॉप फाइव्ह'च्या मुलाखती पार पडल्या आहेत. या मुलाखतींना सात दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप त्यातील एका जणाची कुलगुरूपदासाठी निवड झालेली नाही. दरम्यान, आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती राजभवनातील सूत्रांनी दिली.
विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी सहा महिन्यांपूर्वी प्रक्रियेला सुरुवात झाली होती. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील शोध समितीने २८ नोव्हेंबर २०२३ रोजी २४ जणांना मुलाखतीसाठी मुंबईत बोलावले होते. त्याच दिवशी सायंकाळी 'टॉप फाइव्ह'च्या नावाची यादी बंद लिफाफ्यात राज्यपाल तथा कुलपती यांच्या कार्यालयाकडे सोपविण्यात आली होती. त्यावर कुलपती कार्यालयाने 'टॉप फाइव्ह'मध्ये असलेल्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील डॉ. विजय फुलारी, डॉ. ज्योती जाधव, पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. विलास खरात, डॉ. संजय ढोले आणि नागपूर येथील डॉ. राजेंद्र काकडे यांच्या नावाचा समावेश होता.
या पाच जणांना १९ डिसेंबर २०२३ रोजी मुलाखतींसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, एकदिवस अगोदर सदरील मुलाखती पुढे ढकलण्यात आल्याचे आदेश आले. त्यानंतर पाच जणांच्या मुलाखती ४ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेनंतर राजभवनात घेण्यात आल्या. प्रत्येक उमेदवारास ८ ते १० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. त्याच दिवशी सायंकाळी नावाची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, कुलगुरूपदाच्या नावाची घोषणा पाच दिवसांनंतरही झालेली नाही. संपूर्ण प्रक्रिया पार पडलेली असताना घोषणा होण्यास कशामुळे उशीर होत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच त्याविषयी उच्चशिक्षण क्षेत्रात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
दोघांची रस्सीखेच, तिसराच बाजी मारण्याची शक्यता
कोल्हापूरचे डॉ. विजय फुलारी यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट प्रयत्न करीत आहे. त्याशिवाय भाजपच्या संबंधित एका गटाचेही त्यांना समर्थन आहे. त्याचवेळी भाजपच्या माध्यमातून राजकारण करीत असलेले विद्यापीठ विकास मंचने पुण्यातील डॉ. संजय ढोले यांच्या नावासाठी आग्रह धरल्याचे समजते. या दोघांच्या ओढाताणीमध्ये 'नागपूरकर' असलेले डॉ. राजेंद्र काकडे बाजी मारून जातील, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.