५० टक्केच प्राध्यापक, तरी १०० टक्क्यांचे करतात काम; रसायनशास्त्र विभागाची यशोगाथा

By राम शिनगारे | Published: December 5, 2023 12:59 PM2023-12-05T12:59:16+5:302023-12-05T13:13:11+5:30

विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात संशोधनासह अध्यापनाचे कार्य उत्तमप्रकारे केले जाते. या विभागात शिक्षण घेतलेले विद्यार्थी जगभरात कार्यरत आहेत.

BAMU News: Only 50% of the professors do 100% of the work; the success story of the chemistry department in the BAMU university | ५० टक्केच प्राध्यापक, तरी १०० टक्क्यांचे करतात काम; रसायनशास्त्र विभागाची यशोगाथा

५० टक्केच प्राध्यापक, तरी १०० टक्क्यांचे करतात काम; रसायनशास्त्र विभागाची यशोगाथा

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाने संशोधन प्रकल्प, अध्यापन आणि विद्यार्थ्यांची राष्ट्रीय परीक्षांमध्ये यशाची परंपरा मागील पाच वर्षांपासून कायम राखली आहे. या विभागात मंजूर १६ पैकी केवळ ८ प्राध्यापकच कार्यरत आहेत. या ५० टक्के असलेल्या प्राध्यापकांनी विभागाचा नावलौकिक कमी होऊ न देता उलट वाढविण्याचे काम केले आहे. संशोधन, अध्यापनात कार्यरत असतानाच या विभागातील प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणात नेतृत्व करण्याची किमयाही साधली आहे.

विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात संशोधनासह अध्यापनाचे कार्य उत्तमप्रकारे केले जाते. या विभागात शिक्षण घेतलेले विद्यार्थी जगभरात कार्यरत आहेत. सध्या विद्यापीठातील विविध विभागामध्ये मोठ्या प्रमाणात प्राध्यापकांची कमतरता आहे. रसायनशास्त्र विभागातही मंजूर १६ पदांपैकी केवळ आठजण कार्यरत आहेत. त्याचवेळी नामांकित प्राध्यापक डॉ. मुरलीधर शिनगारे, डॉ. राम माने, डॉ. बी. आर. आरबाड आणि डॉ. टी. के. चौडेकर, डॉ. सी. एच. गील हे मागील काही वर्षात विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्यानंतर उर्वरित प्राध्यापकांनी विभागाची धुरा यशस्वीपणे सांभाळली असल्याचे लोकमतच्या विशेष भेटीत आढळून आले.

कोट्यवधींचे संशोधन प्रकल्प
डीएसटी, सीएसआयआर, युजीसी, बीआरएनएस, विद्यापीठ या संस्थांनी मंजूर केलेले कोट्यवधी रुपयांचे संशोधन प्रकल्प विभागात सुरू आहेत. विद्यापीठाने विभागप्रमुख डॉ. सुनील शंकरवार, डॉ. बापू शिंगटे, डॉ. भारस्कर साठे, डॉ. गिरीबाला बोंडले, डॉ. अनुसया चव्हाण यांना संशोधनासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, तर डॉ. बोंडले यांना ३० लाख, डॉ. साठे यांच्याकडे ५४ लाखांचा संशोधन प्रकल्प विविध संस्थांनी मंजूर केलेला आहे. तसेच यूजीसी-सॅपचा कोटी ४० लाखांचा प्रकल्प सामूहिक रीतीने विभागात सुरू आहे. तसेच डॉ. साठे यांनी २३ लाख, ८२ लाख, १७ लाख आणि ४२ लाखांचे संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्याशिवाय डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. अंजली राजभोज, डॉ. मच्छिंद्र लांडे, डॉ. अनुसया चव्हाण यांनीही संस्थांकडून मिळालेले लाखोंचे संशोधन प्रकल्प काही वर्षांपूर्वी पूर्ण केले आहेत.

दोन पेटंट मंजूर, दोन प्रकाशित
विभागातील तरुण संशोधक डॉ. भास्कर साठे, डॉ. बापू शिंगटे यांना प्रत्येकी एक पेटंट नुकतेच प्राप्त झाले आहे. त्याशिवाय दोघांचे प्रत्येकी एक-एक पेटंट प्रकाशित झाले असून, त्याची अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. विभागातील कार्यरत आठ प्राध्यापकांचे तब्बल २२२ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये मागील पाच वर्षांत प्रकाशित झाले आहेत. तसेच विभागात मागील तीन वर्षांत २७ विद्यार्थ्यांनी विविध संस्थांची संशोधन शिष्यवृत्ती मिळवून पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केले असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. सुनील शंकरवार यांनी दिली.

राष्ट्रीय परीक्षांमध्ये यश मिळवलेले विद्यार्थी
वर्ष...................सेट.....................नेट........................गेट

२०१८-१९..........०२.......................११.........................०९

२०१९-२०..........१३......................१६..........................०८

२०२०-२१...........०४....................०४..........................०४

२०२१-२२...........११....................१५..........................१३

२०२३-२४..........०७....................०४...........................--

एकुण...............३७....................५० (३१ जीआरएफ).......३४

विद्यापीठाच्या लौकिकात भर
विभागाचा लौकिक कायम टिकविण्यासह नवनवीन प्रयोग राबविण्यासाठी सर्वच सहकारी कायम प्रयत्न करतात. त्याशिवाय संशोधन प्रकल्प, संशोधन, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परीक्षांमध्ये मार्गदर्शनही कायम केले जाते. विद्यापीठाच्या लौकिकात भर घालण्याचे काम रसायनशास्त्र विभाग कायम करीत आला आहे.
- डॉ. सुनील शंकरवार, विभागप्रमुख, रसायनशास्त्र, विद्यापीठ

Web Title: BAMU News: Only 50% of the professors do 100% of the work; the success story of the chemistry department in the BAMU university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.