अंबाजोगाईत विद्यापीठाला मिळाली २५ एकर जमीन; कौशल्य विकास केंद्राचा प्रस्ताव
By राम शिनगारे | Published: December 25, 2023 12:08 PM2023-12-25T12:08:49+5:302023-12-25T12:10:11+5:30
सातबाऱ्यावर लागले विद्यापीठाचे नाव; कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत विद्यापीठाच्या मालकीची जमीन
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात २५ एकर जमीन राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. या जमिनीवर विद्यापीठ कौशल्य विकास केंद्राची उभारणी करणार आहे. जालना शहरानंतर अंबाजोगाईमध्ये विद्यापीठास कौशल्य विकास केंद्रासाठी जागा उपलब्ध झाली आहे. या जागेवर २६ डिसेंबर रोजी कुलगुरूंच्या हस्ते नामफलकाचे अनावरण केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंद्राची स्थापना करण्याची तरतूद आहे. त्यानुसारच जालना येथे कौशल्य विकास केंद्रासाठी राज्य शासनाने २५ एकर जमीन उपलब्ध करून दिली. त्यासाठी तत्कालीन प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी पुढाकार घेतला होता. त्याच वेळी बीड जिल्ह्यातील कौशल्य केंद्र अंबाजोगाई येथे स्थापन होण्यासाठी तत्कालीन व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा अधिसभा सदस्य डॉ. नरेंद्र काळे हे प्रयत्न करीत होते. त्यांनी अधिसभेच्या बैठकीत त्यावर निर्णय घेण्यास भागही पाडले. त्यानुसार विद्यापीठाने अंबाजोगाई येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तसेच जिल्हा प्रशासनाकडे २५ एकर जमिनीची मागणी केली. केंद्रासाठी जमीन उपलब्ध झाली असून, सातबाऱ्यावर विद्यापीठाचे नावही लागले आहे. आता अंबाजोगाईवासीयांना कौशल्य केंद्र लवकर सुरू होण्याची अपेक्षा आहे.
चारही जिल्ह्यांत विद्यापीठाची जमीन
मुख्य परिसरात ७२५ एकर जमीन विद्यापीठाच्या मालकीची आहे. धाराशिव येथील उपकेंद्रासाठी ६० एकर, जालना येथील कौशल्य केंद्रासाठी २५ एकर तर घनसावंगी येथील मॉडेल कॉलेजसाठी १० एकर जमीन विद्यापीठाच्या मालकीची आहे. आता बीड जिल्ह्यात अंबाजोगाईत विद्यापीठाच्या मालकीची २५ एकर जमीन झाली आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत विद्यापीठाच्या मालकीची जमीन असणार आहे.
केंद्र, राज्य शासनाकडे २५ कोटींचा प्रस्ताव
केंद्र शासनासह राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाला २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. हा निधी प्राप्त झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी कौशल्य केंद्र उभारण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय अंबाजोगाईतील कौशल्य केंद्रात आद्यकवी मुकुंदराज अध्यासन केंद्राचे मुख्यालयही करण्यात येणार आहे.
-डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू
जमीन मिळाली; आता केंद्र उभारा
आम्हा अंबाजोगाईकरांची मागणी असलेले मराठी भाषा विद्यापीठ विदर्भात पळविण्यात आले. आता कौशल्य विकास केंद्रासाठी अंबाजोगाईत २५ एकर जागा मिळाली आहे. केंद्राच्या विकासासाठी शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून देत कौशल्य केंद्र उभारून युवकांना रोजगाराभिमुख बनवावे.
-डॉ. नरेंद्र काळे, अधिसभा सदस्य, अंबाजोगाई