विद्यापीठातील संशोधकांना पेटंट मिळताहेत पण त्याचे पुढे काय होते?
By राम शिनगारे | Published: March 6, 2024 06:25 PM2024-03-06T18:25:06+5:302024-03-06T18:26:03+5:30
पेटंटचा उपयोग व्यवसाय, उद्योगांसाठी होत नसल्याचे सत्य समोर
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्राध्यापकांना मागील पाच वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल २५ पेक्षा अधिक पेटंट मिळाली असून, १५ प्रकाशित झाली आहेत. त्याशिवाय पेटंट मिळविणाऱ्यांमध्ये संलग्न महाविद्यालयातील संशोधक प्राध्यापकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. पेटंट मिळाल्यानंतर त्याचे काय होते? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. त्याचा शोध घेतला असता, मिळविलेल्या पेटंटचा वापर पुढील संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, संबंधित प्राध्यापकांना त्याचे व्यवसाय, उद्योग उभारणीसाठी संधीच उपलब्ध होत नसल्याचे 'लोकमत'च्या पाहणीत आढळून आले आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात संशोधक प्राध्यापकांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून दाखल संशोधनास स्वामित्व हक्क (पेटंट) देण्यात आले आहेत. हे स्वामित्व हक्क दिल्यानंतर संबंधित संशोधनावर संपूर्णपणे हक्क संशाेधकांचा राहतो. संबंधित संशोधनाचा उपयोग समाज, उत्पादनाच्या निर्मितीसाठी झाला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक संशोधकांचे प्रयत्न असतात. मात्र, संशोधकांना पेटंट मिळाल्यानंतर त्याचे व्यावसायिकरण करण्यासाठी वेगवेगळे उद्योग, कंपन्यांचे सहकार्य आवश्यक आहे. मुंबई-पुण्यातील संशाेधकांना उद्योगांकडून मागण्या मोठ्या प्रमाणात असतात. त्या तुलनेत छत्रपती संभाजीनगरात व्यवसाय उद्योगाच्या उभारणीसाठी संधीच नाहीत, असे संशोधक प्राध्यापकांनी ''''लोकमत''''शी सांगितले.
संशोधकांचा वाढतो बायोडाटा
पेटंट मिळाल्यानंतर त्याचा उपयोग व्यवसाय, उद्योग उभारणीसाठी झाला नाही तरी संशोधक प्राध्यापकांचा बायोडाटा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा उपयोगही संशोधकांच्या वैयक्तिक प्रगतीसाठी, वेगवेगळ्या संधी मिळण्यामध्ये होत असल्याचेही आढळून आले आहे.
व्यवसाय किंवा उद्योगासाठी कुलगुरूंचे प्रयत्न
ब्रिद्री हस्तकलेच्या वस्तूंसाठी लागणाऱ्या बिदर किल्ल्यातील मातीला विद्यापीठातील तीन संशोधक प्राध्यापकांनी पर्याय शोधला आहे. त्यात डॉ. भास्कर साठे, डॉ. अभिजित शेळके आणि डॉ. कृष्णप्रिया रोला यांचा समावेश आहे. या संशोधनाला नुकतेच पेटंट जाहीर झाले. या पेटंटच्या प्राप्तीनंतर त्यावर उद्योग उभारणी किंवा व्यवसाय प्रारंभ व्हावा यासाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनात संशोधक वस्तू बनविणाऱ्या व्यवसायिकांची कार्यशाळा घेणार आहे. त्यातून ब्रिदी कलेविषयीचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी संशोधक मार्गदर्शन केले जाणार आहे.
स्टार्टअप सुरू करण्यास प्राधान्य
विद्यापीठातील संशोधक प्राध्यापकांना पेटंट मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. या पेटंटचा उपयोग व्यवसाय उभारणीसाठी उद्योग उभारणीसाठी विद्यापीठ प्रशासन संबंधितांना सर्वतोपरी सहकार्य करेल. सध्या विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्रात ६८ कोटी रुपयांचे स्टार्टअप सुरू आहेत. पेटंट मिळविलेल्या विषयांवरही स्टार्टअप सुरू करण्यासाठी आगामी काळात प्राधान्य असणार आहे.
- डॉ. विजय फुलारी, कुलगुरू