विद्यार्थ्यांवर दाखल गुन्ह्यांच्या विरोधामुळे अधिसभा सदस्यांना विद्यापीठाची कारणे दाखवा नोटिसा
By राम शिनगारे | Published: February 21, 2024 05:07 PM2024-02-21T17:07:07+5:302024-02-21T17:07:47+5:30
सात दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याच्या सूचना
छत्रपती संभाजीनगर : 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी विद्यापीठात येऊन धुडगूस घातल्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर प्रशासनाने गुन्हे नोंदवले होते. विद्यार्थी नेत्यांवर नोंदवलेला गुन्हा घृणास्पद असून, तत्काळ परत घेण्याची मागणी करणाऱ्या तीन अधिसभा सदस्यांना प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
विद्यापीठ कॅम्पसमध्ये बाहेरून आलेल्या टोळक्याने दहशत निर्माण केली होती. त्याच्या निषेधार्थ आंबेडकरी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करून धुडगूस घालणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली. यानंतर विद्यापीठाने धुडगूस घालणाऱ्या अज्ञात टोळक्यासोबतच कुलगुरू दालनासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांवरही गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे, डॉ. विक्रम खिल्लारे आणि डॉ. उमाकांत राठोड यांनी १५ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देत विद्यार्थी नेत्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.
या सदस्यांना कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात अधिसभा सदस्य म्हणून विद्यापीठ प्रशासनासोबत आपली भूमिका सुसंगत असणे अपेक्षित आहे. आपण अधिसभेचे सदस्य असण्याखेरीज संलग्नित महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहात. त्या अर्थी कुलगुरू महोदयांना उद्देशून केलेला पत्रव्यवहार हा राजशिष्टाचाराच्या संकेतांचे पालन करणारा असणे अपेक्षित आहे. निवेदनातील आपण नमूद केलेल्या बाबी, ती मांडण्याची पद्धत आणि त्यातील भाषा हे अधिसभेचे सदस्य म्हणून अनपेक्षित आहे. हे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतुदींप्रमाणे असमर्थनीय असून गैरवर्तन प्रकारात मोडणारे आहे, असे यात म्हटले आहे. याविषयी प्रभारी कुलसचिव डॉ. अमृतकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.
मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न
अधिसभा सदस्यांना विद्यापीठ कायद्यातील सेक्शन २८ (१) प्रमाणे शैक्षणिक, अशैक्षणिक घडामोडींबद्दल विचारणा करण्याचे अधिकार आहेत. नोटीसमध्ये उल्लेख केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा नियम अधिसभा सदस्यांना लागू होतो का? हे सदस्य विद्यापीठाचे कायमस्वरूपी कर्मचारी नाहीत. निवेदन देणारे तिन्ही सदस्य हे संघटनांचे पदाधिकारी आहे. आगामी काळात कोणताही प्रश्न विचारू नये, यासाठी अशा पद्धतीने मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे. यामागचा मास्टरमाइंड कोण? त्याचा शोध घेतला जाईल.
- डॉ. शंकर अंभोरे, अधिसभा सदस्य