विद्यापीठ निवडणार २९० कंत्राटी, तासिका तत्वावर प्राध्यापक; स्थानिक निधीतुन होणार वेतन
By राम शिनगारे | Published: June 11, 2023 07:33 PM2023-06-11T19:33:44+5:302023-06-11T19:33:51+5:30
४५ कंत्राटी, २४५ तासिका प्राध्यापकांचा समावेश. नव्याने फाॅरेन्सिक सायन्स विभाग सुरू होणार.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांमध्ये मंजुर प्राध्यापकांच्या जागांपैकी तब्बल अर्ध्यांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्रशासनाने कंत्राटी, तासिका तत्वावरील प्राध्यापकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग आण धाराशिव उपपरिसरातील विभागांमध्ये प्राध्यापकांच्या २८९ जागा मंजुर आहेत. त्यापैकी १४४ जागांवर प्राध्यापक कार्यरत असून १४५ जागा रिक्त आहेत. रिक्त पदांपैकी ७३ पदांची भरती प्रस्तावित आहे. त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठ निधीतुन कंत्राटी, तासिका तत्वावर प्राध्यापक नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. त्यास व्यवस्थापन परिषदेनेही मान्यता दिलेली आहे.
२४ हजार रुपये प्रतिमहिना या प्रमाणे ४५ कंत्राटी प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. यामध्ये विद्यापीठ परिसरातील २१ विभागातील ३० पदांचा समावेश असून, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेतील ९, उपपरिसरातील ६ पदांचा समावेश आहे. तासिका तत्वावरील २४५ प्राध्यापक विद्यापीठाचा मुख्य परिसर, उपकेंद्र, मॉडेल कॉलेज घनसावंगी, संतपीठ पैठण, जीएमएनआयआरडी, डीडीयुकेके, प्रीआयएएस कोचिंग सेंटर आदींसह ५५ विभागांचा समावेश आहे.
नव्याने फाॅरेन्सिक सायन्स विभाग सुरू होणार
नव्याने सुरू होत असलेल्या न्यायवैद्यकशास्त्र (फॉरेन्सिक सायन्स ) या विभागात कंत्राटी चार व तासिका तत्त्वावरील चार अशी आठ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने २६ जूनपर्यंत भरावेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली. तर कंत्राटी पदांसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांनी ३० जून पर्यंत अर्जाची हार्डकॉपी आस्थापना विभागात दाखल करणे बंधनकारक आहे.