अबब...२२३ महाविद्यालयांची युवक महोत्सवाकडे पाठ
By राम शिनगारे | Published: October 3, 2023 09:07 PM2023-10-03T21:07:12+5:302023-10-03T21:08:04+5:30
२५० महाविद्यालयांची नोंदणी : चार दिवस होणार विद्यापीठात कलाविष्कार
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवाला विद्यापीठात बुधवारपासून (दि.४) सुरुवात होत आहे. या महोत्सवात विद्यापीठाशी संलग्न ४७३ महाविद्यालयांपैकी फक्त २५० महाविद्यालयांनी नोंदणी केली. तर २२३ महाविद्यालयांनी महोत्सवाकडे पाठ फिरविल्याचे महोत्सवाच्या पुर्वसंध्येला स्पष्ट झाले. त्यातही २५० पैकी किती महाविद्यालये संघ पाठवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विद्यापीठात ४ ते ७ ऑक्टोंबर दरम्यान होणाऱ्या महोत्सवात सहा कला गटात ३६ प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. यासाठी सहा रंगमंच उभारले आहेत. यामध्ये नृत्य, नाटय, संगीत, वाड़ःमय, ललित कला व महाराष्ट्राच्या लोककलांचा समावेश आहे. त्यात एकुण ३६ कलाप्रकार असणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील एकुण २५० महाविद्यालयातील १३३७ मुली, ११७६ मुलांसह एकुण २५१३ विद्यार्थी सहभागी होत आहे. या विद्यार्थ्यांसोबत ४१८ महिला व पुरुषांचे संघ सहभागी असणार आहेत. दरम्यान, महोत्सवात सहभागी न होणाऱ्या महाविद्यालयांनी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला जात आहे.
योगेश शिरसाठ यांच्या हस्ते उद्घाटन
मराठवाड्याचा भूमिपुत्र अभिनेते योगेश शिरसाठ यांच्या हस्ते युवक महोत्सवाचे नाट्यगृह परिसरातील सृजन रंगमंचावर बुधवारी सकाळी ११ वाजता उद्घाटन होईल. यावेळी अभिनेत्री अनुष्का सरकटे यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले असतील. यावेळी प्रकुलगुरू डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगिता होके पाटील, ॲड. दत्ता भांगे यांची उपस्थिती असणार आहे. त्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मुख्य रंगमंचापर्यंत शोभायात्रा निघणार आहे. समारोपाला अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अभिनेते प्रवीण डाळींबकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
पत्रिकेच्या गोंधळाची परंपरा कायम
चार जिल्ह्यातील हजारो कलाकारांचा सहभाग असलेल्या महोत्सवाची निमंत्रण पत्रिका उद्घाटनाच्या पुर्वसंध्येपर्यंत कोणालाही प्राप्त झालेली नव्हती. नेहमीप्रमाणे पत्रिकांची छपाई एक दिवस आधी करण्यात आली. तर महोत्सवाच्या लोगोलाही शेवटच्या दिवशी मान्यता घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ठरविलेल्या पाहुण्याचे नावही पहिल्या पत्रिकेत चुकविल्यामुळे पुन्हा एकदा पत्रिकांची छपाई करावी लागली आहे.