विद्यापीठातील संस्थेला हवा निवृत्त आयएएस; विभागप्रमुखांची पदे आरक्षणमुक्त, थेट मुलाखत होणार
By राम शिनगारे | Published: September 13, 2024 08:08 PM2024-09-13T20:08:21+5:302024-09-13T20:08:53+5:30
विद्यापीठातील ‘गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थे’च्या (जीएमएनआयआरडी) संचालकपदासाठी सेवानिवृत्त आयएएसची पात्रता ठरवली आहे.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थे’च्या (जीएमएनआयआरडी) संचालकपदासाठी सेवानिवृत्त आयएएसची पात्रता ठरवली आहे. त्याचवेळी चार विभागप्रमुख आणि आठ सहायक प्राध्यापकांची नियुक्ती केली जाणार आहे. विभागप्रमुखांची पदे आरक्षणाविना भरली जाणार आहेत. या सर्वांची निवड थेट मुलाखतींद्वारेच होणार असल्याचेही जाहिरातीतून स्पष्ट झाले आहे.
जीएमएनआयआरडी संस्थेत चार पदव्युत्तर, पाच पदविका आणि दहा प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवले जातात. पदव्युत्तर अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी ३० जागा मंजूर असून, चालू शैक्षणिक वर्षात सर्व अभ्यासक्रमांना मिळून ७० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. या संस्थेसाठी राज्य शासनाने एकाच वेळी साडेबारा कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. त्यापैकी काही निधी विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. या संस्थेचे संचालकपद विद्यापीठातील अनेक प्राध्यापकांनी सक्षमपणे भूषविलेले असतानाच पहिल्यांदाच सेवानिवृत्त आयएएस अधिकारी नेमण्यासाठी जाहिरात दिली. त्यासाठी प्रतिमहिना १ लाख रुपयांचे मानधनही ठरविले आहे. या पदासाठी आयएएससह शासकीय संस्थेचा सेवानिवृत्त संचालक, पदव्युत्तर प्राध्यापकही अर्ज करून शकतात.
५० हजार रुपयांच्या मानधनावर चार विभागप्रमुख सेवानिवृत्त प्राध्यापकांमधून निवडले जाणार आहेत. या पदांसाठी आरक्षण लागू नाही. मात्र, विद्यापीठाने चार अधिष्ठाता पदांसाठी आरक्षण लागू केलेले आहे. तसेच इतर आठ सहायक प्राध्यापकांना ३२ हजार मानधनावर नियुक्त केले जाणार आहे. त्यासाठी परीक्षा न ठेवता थेट मुलाखतीद्वारे नियुक्त केले जाणार आहे. मात्र, विद्यापीठातील इतर विभागांमध्ये मानधनावरील सहायक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी परीक्षा व त्यानंतर मुलाखती घेतल्या होत्या. त्यास याठिकाणी फाटा दिल्याचे दिसून येत आहे.
माणसे ठरवून जाहिरात दिल्याची चर्चा
संचालकपदासाठी शहरातील एका सेवानिवृत्त आयएएसची निवड होणार आहे. त्यासाठी मानधनही तगडे ठेवण्यात आले असून, चार विभागप्रमुखांची नावेही अगोदरच ठरल्याची चर्चा विद्यापीठात सुरू आहे. पाच पदांसाठी ११ महिन्यांसाठी तब्बल ३३ लाख रुपये मानधन अदा केले जाणार, हे विशेष.
जीएमएनआयआरडी संस्थेतील विविध पदांच्या नियुक्तीसाठी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार प्रशासनाने जाहिरात दिलेली आहे. मात्र, संचालकपदासाठी सेवनिवृत्त आयएएसची निवड, सहायक प्राध्यापकांसाठी परीक्षा न घेता थेट मुलाखतीद्वारे नियुक्ती याविषयी अधिक भाष्य करता येणार नाही.
-डॉ. प्रशांत अमृतकर, कुलसचिव