तांत्रिक मदत ते उद्योजक घडविण्यात विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभाग आघाडीवर
By राम शिनगारे | Published: January 18, 2024 07:04 PM2024-01-18T19:04:05+5:302024-01-18T19:04:29+5:30
विद्यापीठ नामविस्तार घोषणेसह मिळाली होती मान्यता; संशोधन, प्रकल्प अन् उत्पन्नामध्ये अग्रेसर
छत्रपती संभाजीनगर : दीर्घ ऐतिहासिक लढ्यानंतर तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा १४ जानेवारी १९९४ रोजी नामविस्तार झाला. या नामविस्ताराची घोषणा करतानाच विद्यापीठात अनेक नवीन विभागांना मान्यता देण्यात आली होती. त्यातील एक केमिकल टेक्नॉलॉजी विभागाने ३० वर्षांच्या कालखंडात विद्यापीठात सर्वात अग्रेसर विभाग असा नावलौकिक कमावला आहे. सर्वोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या विभागासह नवीन उद्योजक घडविणे, उद्योगांना तांत्रिक साहाय्य करण्यासह मोठ्या प्रमाणात संशोधनाचे कामही विभागात अविरत सुरू आहे.
केमिकल टेक्नॉलॉजी विभागाने गुणवत्ते बरोबरच प्रशासकीय नेतृत्व देण्यातही भूमिका बजावली. या विभागाचे माजी प्रमुख डॉ. देवानंद शिंदे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविले. त्याशिवाय मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठांच्या प्रभारी कुलगुरूंची धुरा सांभाळली. सध्या ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर कार्यरत आहेत. याच विभागाचे मावळते विभागप्रमुख डॉ. प्रवीण वक्ते यांनी प्र-कुलगुरू म्हणून कार्यशैलीचा ठसा उमटविला. संतपीठात अभ्यासक्रम सुरू करीत गाडी रुळावर आणली. विद्यमान विभागप्रमुख डॉ. भगवान साखळे यांनी कुलसचिव, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय संस्थेचे संचालकपद भूषविताना कामाचा ठसा उमटवला.
विभागातील प्रा. सचिन भुसारी, डॉ. अनिकेत सरकटे, डॉ. विनय लोमटे, प्रा. गौरी कल्लावार, प्रा. विवेक राठोड, प्रा. पांढरे यांच्यासह इतर प्राध्यापक संशोधनात अग्रेसर आहेत. प्रा. भुसारी यांना नुकताच साडेतीन कोटी रुपयांचा संशोधन प्रकल्प मंजूर झाला.
पाच पदव्युत्तर, दाेन पदवी अभ्यासक्रम
केमिकल टेक्नॉलॉजी विभागात पाच पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि दोन पदवी अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. सर्व अभ्यासक्रम व्यावसायिक असून, त्यातून विद्यापीठास ६० लाख रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळते. या विभागात ११ प्राध्यापकांची पदे मंजूर असून, ७ जण कार्यरत आहेत. सध्या विभागात १३७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ४० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे.
१४ पेटंट, कोट्यवधींचे संशोधन प्रकल्प
विभागातील प्राध्यापकांचे एकूण १४ पेटंट प्रकाशित झाले आहेत. त्यातील ९ ग्रँट झाले आहेत. विभागाच्या प्राध्यापकांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर ३०० पेक्षा अधिक शोधनिबंध, ८ ग्रंथ आणि ४५ पेक्षा अधिक बुक चॅप्टर प्रकाशित झाले आहेत. विभागात आतापर्यंत डीएसटी फिस्ट, यूजीसी, सीएसआयआर, एसईआरबी, एआयसीटी, आयसीएमआर आदी संस्थांचे मिळालेले १० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत.
विभागास 'आयएसओ' मानांकन
केमिकल टेक्नॉलॉजी विभाग आयएसओ मानांकन प्राप्त एकमेव विभाग आहे. २०१० साली या विभागाला आयएसओचे मानांकन जाहीर झाले होते. विभागाने ९ हजार तरुणांना रोजगारासाठीचे प्रशिक्षण दिलेले असून, प्रवेश घेतलेल्या जवळपास ९० विद्यार्थ्यांना राेजगाराची कॅम्पसमध्ये संधी निर्माण झालेली आहे.
१० क्लस्टर, ५ कंपन्यांना मदत
विभागातील प्राध्यापकांनी नवउद्योजकांना १० क्लस्टर विकसित करण्यासाठी सर्व प्रकारची तांत्रिक मदत पुरवली. त्याशिवाय ५ कंपन्यांना तांत्रिक मदतही करण्यात येत असल्याचे विभागप्रमुख डॉ. भगवान साखळे यांनी सांगितले.
उद्योजक घडविण्याचे काम
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाचा नावलौकिक उंचावण्यासाठी विभागातील प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. संशोधक, उद्योजक घडविण्याचे काम विभागाने मागील ३० वर्षांत केले आहे.
- डॉ. भगवान साखळे, विभागप्रमुख, केमिकल टेक्नॉलॉजी
विद्यार्थी जगाच्या कोनाकोपऱ्यात पोहोचले
केमिकल टेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थी जगाच्या कोनाकोपऱ्यात पोहोचले आहेत. या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण, प्रशिक्षण देण्याचे काम विभागाने केले. त्यात विभागातील प्रत्येकाचा वाटा आहे.
- डॉ. प्रवीण वक्ते, प्राध्यापक, केमिकल टेक्नॉलॉजी