१६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग बंदी; क्लासेस चालक नकारात्मक, पालक सकारात्मक

By राम शिनगारे | Published: February 1, 2024 07:01 PM2024-02-01T19:01:04+5:302024-02-01T19:02:52+5:30

केंद्र शासनाच्या सूचनांवर मतमतांतरे : १६ वर्षांनंतरच्या क्लासेसवरही अनेक निर्बंध

Ban on coaching of students below 16 years; Classes driver negative, parents positive | १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग बंदी; क्लासेस चालक नकारात्मक, पालक सकारात्मक

१६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग बंदी; क्लासेस चालक नकारात्मक, पालक सकारात्मक

छत्रपती संभाजीनगर : युवकांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेऊन केंद्र शासनाने क्लासेसच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना नुकत्याच जाहीर केल्या आहेत. या सूचनांमध्ये १०वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये प्रवेश देण्यावरच बंदी घातली आहे. त्याशिवाय दहावीनंतरच्या क्लासेसवर काही निर्बंध घालतानाच शाळा, महाविद्यालयांच्या वेळेत क्लास सुरू करता येणार नाहीत. पाच तासांपेक्षा अधिक कालावधी क्लासेसमध्ये शिकवू नये, क्लासेसमधील प्रवेश म्हणजे नामांकित संस्थातील प्रवेशाची हमी नाही, हे विद्यार्थ्यांसह पालकांना सांगावे. दिशाभूल करणारी आश्वासने देऊ नयेत, क्लासेसमधील सुविधांची माहिती, शिक्षकांची संख्या आणि त्यासाठी आकारले जाणारे शुल्क हे क्लासेसच्या परिसरात फलकावर लावावे, क्लास बंद केल्यास विद्यार्थ्यास भरलेले शुल्क परत मिळावे, अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास क्लासेसला २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत दंड करण्याच्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजाणी राज्य शासनाला करावी लागणार आहे. केंद्राच्या सूचनांमध्ये क्लासेसला खलनायक ठरविण्याचा प्रयत्न केल्याची भावना क्लासेस चालकांची झाली आहे. नियम बनविताना क्लासेसमधील तज्ज्ञांच्या सूचनाही शासनाने विचारात घेतल्या पाहिजेत, असे मत अनेक क्लासेस चालकांनी व्यक्त केले, तर १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना क्लासेस बंदी हा योग्य निर्णय असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे.

स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणे कठीण होईल
विद्यार्थ्यांची शालेय जीवनातील शेवटची दोन वर्षे अतिशय महत्त्वाची असतात. त्या दोन वर्षांतील तयारीवरच नीट, जेईईसारख्या परीक्षांचा पाया पक्का होतो. मात्र, १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग बंद केल्यास कमकुवत विद्यार्थ्यांवर परिणाम होईल. या निर्णयामुळे हुशार अधिक हुशार होतील. मागे राहिले ते अधिक मागे राहतील. १०वीपर्यंत क्लासेस विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्याचे काम करतात. ते या निर्णयामुळे थांबेल.
-प्रा. धनंजय वैद्य, संचालक, वैद्य अकॅडमी

शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही होईल
केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाने क्लासेसच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने काही सूचना केल्यानंतर त्यानुसार विभाग, जिल्हास्तरावर कार्यवाही करता येईल.
-अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक

धोरण ठरविताना विश्वासात घ्यावे
केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यात राज्य शासनाने अंमलबजावणीसाठी निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. त्यानुसार राज्य शासनाने क्लासेसविषयी धाेरण ठरविताना विश्वासात घेतले पाहिजे. अनेक पात्रताधारक युवकांना शासकीय नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे लाखो नागरिक या व्यवसायात आहेत. त्यांचा विचार करूनच धाेरणाची अंमलबजावणी केली जावी.
-प्रा. गोपीचंद चाटे, अध्यक्ष, चाटे शिक्षण समूह

सकारात्मक बाबींचा विचार व्हावा
शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून हवी तशी स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जात नाही. क्लासेसमध्ये त्याविषयी तयारी करून घेत विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम केले जाते. त्यामुळे शासनाने सकारात्मक बाबी विचारात घेऊन निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे.
- डॉ. भास्कर शिंदे, संचालक, एआयबी क्लासेस

१६ वर्षांपर्यंत क्लासेसला बंदीच असावी
शाळा संपताच मुले घरी आल्यानंतर लगेच क्लासेसला पाठवली जातात. या मुलांना आई-वडिलांपासून दूर राहावे लागते. अभ्यासात हुशार होण्यासाठी मुलांना क्लास बंधनकारक केला जातो. त्यामुळे केंद्र शासनाने १६ वर्षांपर्यंत मुलांना क्लासेससाठी घातलेली बंदी हा अतिशय निर्णायक आहे.
-डॉ. राखी सलगर-गडदे, पालक

शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे
मुलांना शाळांमध्ये सकाळीच जावे लागते. जेव्हा मुले घरी येतात तेव्हा थकून गेलेली असतात. त्यानंतर त्यांना क्लासेसला पाठविणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळांमध्येच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शाळांमधील शिक्षकांसह इतरांच्या नेमणुकांची तपासणीसह सुविधा पाहिल्या पाहिजेत. असे केल्यास कोणीही क्लासेस लावणार नाही.
-विजय भांडे, पालक

मानसिकता बदलण्यास मदत
आयआयटी फाउंडेशनच्या नावाखाली सहावी-सातवीपासूनच क्लासेस सुरू करण्यात येतात. त्यामुळे मुलांना मानसिक तणाव येतो. अभ्यासात हुशार असेल तरच मुलगा हुशार ही मानसिकता तयार झालेली आहे. दहावीपर्यंत क्लासेस बंदी केल्यास ही मानसिकता बदलण्यास मदत होईल. क्लासेसचा वेळ विद्यार्थ्यांना मोकळा मिळाल्यास त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास होण्यास मदत होईल.
- डॉ. अपर्णा अष्टपुत्रे- शिसोदे, विभागप्रमुख, मानसशास्त्र विभाग, विद्यापीठ

Web Title: Ban on coaching of students below 16 years; Classes driver negative, parents positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.