मान्सून लांबल्याने बियाणे विक्री व्यापार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 07:28 PM2019-06-22T19:28:20+5:302019-06-22T19:30:13+5:30
हवामान खात्याने दिशाभूल करू नये
औरंगाबाद : खरीप हंगामाला सुरुवात होऊन १३ दिवस झाले, पण मान्सून अजूनही जिल्ह्यात दाखल झाला नाही. मान्सूनपूर्व पावसाच्या जोरावर जिल्ह्याच्या उत्तर दिशेकडील तालुक्यात २० ते ३० टक्के शेतकऱ्यांनी धूळपेरणी करून ठेवली आहे. ती वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरवर्षी २०० कोटींचे बियाणे खरीप हंगामात विकले जाते. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक बियाणे अजूनही विक्रेत्यांकडेच पडून आहे. मान्सून लांबल्याचा फटका शेतकऱ्यांबरोबर बियाणे उद्योगालाही बसणार आहे.
खरीप हंगामाला ७ जूनपासून सुरुवात झाली, पण मान्सून लांबल्याने शेतकरी व बियाणे विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. औरंगाबाद जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात दरवर्षी कपाशी ११० कोटी, मका ६० कोटी व इतर बियाणे ३० कोटी, असे एकूण २०० कोटींचे बियाणे विकले जाते. फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद, कन्नड तालुक्यांत एकूण बियाणे विक्रीपैकी ६० टक्के बियाणे विक्री झाले आहे. पूर्व मोसमी पावसामुळे या भागातील २० टक्के शेतामध्ये धूळपेरणी करण्यात आली आहे. या भागात कपाशी व मका बियाणे जास्त विक्री झाले तर औरंगाबाद, पैठण, वैजापूर, गंगापूर या तालुक्यांमध्ये आजपर्यंत २० टक्केच बियाणे विक्री झाले आहे.
येत्या आठवडाभरात पाऊस झाला नाही तर धूळपेरणी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी साहित्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राकेश सोनी यांनी सांगितले की, जर जूनअखेरपर्यंत पाऊस पडला नाही तर मूग व उडीद ऐवजी तूर व बाजरीचा पेरा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल.
जिल्ह्यात सुमारे १५०० बियाणे, खत विक्रेते आहेत. मागील वर्षी दुष्काळामुळे अजूनही उधार दिलेल्या बियाणांची रक्कम मिळाली नाही. यंदाही विक्रेत्यांनी अनेक शेतकऱ्यांना उधारीवर बियाणे दिले आहे. पाऊस आला नाही तर शेतकरी हतबल होईल व बियाणे विक्रेतेही आर्थिक अडचणीत येतील. यातील अनेकांना दुकान बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
हवामान खात्याने दिशाभूल करू नये
औरंगाबाद जिल्हा कृषी साहित्य विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हवामान खात्याकडून मान्सूनसंदर्भात सतत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. चॅनलवरही त्याचे विश्लेषण दाखविले जात आहे. कधी २४ जुलै नंतर मान्सून सक्रिय होणार, असा अंदाज वर्तविला जात आहे तर कधी दोन ते तीन दिवसांत मान्सून दाखल होणार असे सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. इंग्लंडमध्ये विश्वकप क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. तेथील हवामान विभाग पावसाचा अचूक अंदाज व्यक्त करीत आहे. तसाच अचूक अंदाज हवामान विभागाने वर्तवावा, दिशाभूल करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली.