पर्यटनाच्या उद्देशाला ‘खो’ देत पर्यटन बसमधून ‘बँड बाजा बारात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 02:14 PM2021-01-07T14:14:23+5:302021-01-07T14:16:44+5:30
एसटीला वातानुकूलित बस विकत घेण्यात अडचणी असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून पर्यटन विकासासाठी मिळालेल्या १ कोटी ८० लाखांच्या निधीतून या दोन बसेस घेण्यात आल्या.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळ लेणीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मिळालेल्या वातानुकूलित पर्यटन बसमधून चक्क ‘बँड बाजा बारात’ सुरू आहे. एका लग्नासाठी पर्यटन बस थेट गुलबर्गा येथे पाठविण्यात आल्याचा प्रकार बुधवारी समोर आला.
शहरात येणाऱ्या पर्यटकांना औरंगाबाद शहराहून जगप्रसिद्ध अजिंठा किंवा वेरूळ लेणी येथे जाण्यासाठी साधी बस किंवा खासगी गाड्यांचा वापर करावा लागत होता. परदेशी पर्यटकांसाठी औरंगाबादहून अजिंठा लेणीपर्यंतचा ३ तासांचा साध्या बसचा प्रवास सुसह्य नाही. त्यामुळे पर्यटकांना चांगली सेवा मिळावी म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी वातानुकूलित बससेवा सुरू करण्याबाबत एसटीकडे विचारणा केली. एसटीला वातानुकूलित बस विकत घेण्यात अडचणी असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून पर्यटन विकासासाठी मिळालेल्या १ कोटी ८० लाखांच्या निधीतून या दोन बसेस घेण्यात आल्या. परंतु, पर्यटक नसल्याचे कारण पुढे करून यापूर्वी या बस वारंवार पुणे मार्गावर चालविण्यात आल्या. आता पर्यटन बस लग्नासाठी बुक करण्यात आली आणि बुधवारी थेट गलबर्गा येथे रवाना करण्यात आली. पर्यटन बस लग्नासाठी गुलबर्गा येथे पाठविली, पण पर्यटक नव्हते. त्यामुळे कोणाचीही गैरसोय झाली नसल्याचे मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक सुनील शिंदे म्हणाले.
पर्यटकांना आकर्षित करण्याकडे दुर्लक्ष
एसटी महामंडळाला पर्यटन बस मिळाल्या, मात्र, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी फारसे प्रयत्न महामंडळाकडून होताना दिसत नाही. त्यामुळे या बससेवेची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचत नाही. परिणामी, पर्यटक नसल्याने बस रद्द करून पुणे मार्गावर पाठविण्याचा प्रकार होत आहे.
माहिती घेतली जाईल
एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाचे नियंत्रक अरुण सिया यांच्याशी संपर्क साधला असता, पर्यटन बस गुलबर्गा येथे पाठविल्यासंदर्भात काहीही माहिती नाही. अन्य बस उपलब्ध होती. ती पाठविता आली असती. याविषयी अधिक माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.