वारसासाठीच बंडगर दाम्पत्याची क्रूरता; तरुणीवर अत्याचार, मुलगा ताब्यात घेऊन देणार होते सोडून
By राम शिनगारे | Published: April 27, 2023 11:57 AM2023-04-27T11:57:44+5:302023-04-27T12:00:38+5:30
दोन मुलीच झाल्या, संपत्तीच्या वारसासाठी मुलगा हवा असल्यामुळे तरुणीवर अत्याचार
छत्रपती संभाजीनगर : स्वत: प्राध्यापक असल्यामुळे गलेलठ्ठ पगार, त्यातच मसाल्याचा उद्योग भरभराटीला आलेला असल्यामुळे आपल्या संपत्तीला कोणी तरी वारस असला पाहिजे, असे वाटणाऱ्या प्राध्यापक पती-पत्नीला मुलगा हवा होता. अगोदर दोन मुलीच झाल्यानंतर अनेक वेळा प्रयत्न करूनही मुलगा झाला नाही. शेवटचा पर्याय म्हणून विद्यार्थिनीसोबत संबंध ठेवून तिच्यापासून मुलगा झाल्यानंतर तो आपल्याला घ्यायचा आणि विद्यार्थिनीला सोडून द्यायचे, असा कट आरोपींनी आखला असल्याची धक्कादायक माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर व त्याची पत्नी पल्लवी बंडगर या दोघांच्या विरोधात विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा गुन्हा बेगमपुरा पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री नोंदविण्यात आला. दोन्ही आरोपी गुन्हा दाखल होताच फरार झाले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रा. बंडगर यास दोन मुली आहेत. त्याने प्राध्यापकाची नोकरी करीत असतानाच पत्नीच्या मदतीने मसाला उद्योग सुरू केला होता. या उद्योगात जम बसल्यानंतर कोट्यवधींची उलाढाल होऊ लागली. त्यातून आलिशान गाडी घेतली. सर्व प्रकारच्या सुख-सुविधा होत्या. मात्र, आपण संपत्ती कमावत असताना मुलगा नसल्याची खंत पती-पत्नीला वाटत होती. दोन मुलीनंतर मुलगा होण्यासाठी दोघांनी खूप प्रयत्न केले. त्यासाठी वैद्यकीय तपासण्या केल्या. नंतर दुसराच विचार सुरू केला.
त्यातून २०१९ मध्ये ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीला हेरले. तिच्या आईचे निधन झालेले आहे. वडील सतत आजारी असतात. बहिणी आणि छोटा भाऊ असल्याचे पाहून प्रा. बंडगरने तिला जाळ्यात ओढले. सुरुवातीला घरीच पेईंग गेस्ट म्हणून ठेवल्यानंतर पीडितेला दोघांनी आई-वडिलांसारखी वागणूक दिली. त्यांच्या दोन मुलींमध्ये तिसरी मुलगी असल्याचे सांगितले जात होते. मात्र, दोघांच्या मनात वेगळेच होते. तिचा विश्वास संपादन करण्यासाठी आर्थिक व्यवहार सांभाळण्यास दिले. त्यानंतर अत्याचार केले. त्याविषयी कोठे काही वाच्यता केल्यास पैसे चोरीचा आरोप केला जाईल, असेही तिला धमकावले जात होते. शेवटी पीडितेनेच बंडगरच्या पत्नीला माहिती दिल्यानंतर तिनेही पतीस सहमती दर्शविल्यामुळे पीडितेला धक्का बसला. पत्नीच सोबत असल्यामुळे प्रा. बंडगर निवांत होता. आपले कोणीच काही वाकडे करू शकत नाही, अशा थाटात तो वावरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तीन महिन्यांपूर्वी आत्महत्येचा विचार
पीडित तरुणी दोघांच्या अत्याचाराला कंटाळली होती. तिच्यावर गर्भवती राहण्यासाठी दोघांकडून दबाव आणला जात होता. त्यातून तिने आत्महत्या करण्याचाही विचार तीन महिन्यांपूर्वी केला होता. मात्र, तिच्या मैत्रिणींनी समजूत काढल्यानंतर शहरातील एका नामांकित मानसोपचार तज्ज्ञाकडे तिने उपचार घेतले. त्या तज्ज्ञाने तिचे समुपदेशन करीत आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
कुलगुरूंकडून धीर
पीडित विद्यार्थिनी गावी गेली होती. तिला वारंवार फोन करून दोघे परत बोलावत होते. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने १९ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या विशाखा समितीकडे तक्रार नोंदवली. ही तक्रार पाहून कुलगुरूंना धक्काच बसला. त्यांनी मुलीला बोलावून घेत धीर दिला. तसेच आम्ही तुझ्यासोबत असल्याचे सांगितले. विशाखा समितीकडून दोन्ही आरोपींना नोटीस जाताच त्यांनी परीक्षा भवनमध्ये समिती सदस्याकडे जाऊन गोंधळ घातला. त्यानंतर मुलीच्या गावी जाऊन तोच प्रकार केला. त्याची नोंदही बुलडाणा जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात करण्यात आली.
पीडितेने आपबितीच केली कथन
पीडितेने मुलगा होण्यासाठी प्राध्यापक पती-पत्नीने केलेल्या अत्याचाराची कहाणीच विशाखा समितीसमोर कथन केली. त्यामुळे धक्का बसलेल्या समितीच्या सदस्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे लेखी पत्र पीडितेला दिले. तसेच तिच्यासोबत विद्यापीठ प्रशासन ठामपणे राहील, असा विश्वासही दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
नियमानुसार चौकशी होत आहे
विद्यापीठातील विशाखा समितीचे कामकाज नियमानुसार सुरू आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांना माहिती देत प्रकरण पोलिसांत सोपविण्याचा निर्णय घेतला. आगामी चौकशीही नियमानुसार होत आहे.
- डॉ. अंजली राजभोज, अध्यक्ष, विशाखा समिती