खासगीकरण धोरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवस संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:07 AM2021-03-13T04:07:31+5:302021-03-13T04:07:31+5:30
औरंगाबाद : बँकांच्या खासगीकरण धोरणाविरोधात १५ व १६ मार्च रोजी बँक कर्मचारी देशव्यापी संप करणार आहेत. या संपात महाराष्ट्रातील ...
औरंगाबाद : बँकांच्या खासगीकरण धोरणाविरोधात १५ व १६ मार्च रोजी बँक कर्मचारी देशव्यापी संप करणार आहेत.
या संपात महाराष्ट्रातील सर्व बँकांच्या १० हजार शाखांमधील ५० हजार कर्मचारी व अधिकारी संपात सहभागी होणार आहेत. याशिवाय खासगीकरणाविरोधात १७ मार्च रोजी विमा कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संप पुकारला आहे. १८ मार्च रोजी एलआयसी कर्मचारी व अधिकारी संप करणार आहेत.
यासंदर्भात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले की, सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या सार्वजनिक बँकेतील लोकांची बचत ९० लाख कोटी आहे. ती रक्कम मोठ्या उद्योजकांच्या हाती सोपविण्याचा डाव रचला गेला आहे. यामुळे सर्वसामान्यांची बचत केलेली रक्कम धोक्यात आली आहे.
ज्या उद्योगपतींनी बँकांचे कर्ज थकविले आहे, ती रक्कम अंतिमतः बँकांना राईट म्हणून माफ करावी लागली आहे. या संपात सर्वसामान्य लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तुळजापूरकर यांनी केले आहे.