बँक अधिकाऱ्याने ५ शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत ४६ लाखांना फसविले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 08:08 PM2024-10-07T20:08:36+5:302024-10-07T20:08:42+5:30
एचडीएफसीच्या सेल्स ऑफिसरचा प्रताप : सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : गांधेलीतील पाच शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत एचडीएफसी बँक अधिकाऱ्याने तब्बल ४६ लाख २० हजार ८३७ रुपयांचा अपहार केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात बँकेच्या सेल्स ऑफिसर विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सुभाष जयवंत नगराळे (रा. गांधेली) असे आरोपी सेल्स ऑफिसरचे नाव आहे. फिर्यादी संतोष रामराव चंदनसे (रा. गांधेली) या शेतकऱ्याच्या वडिलांनी गावातील शेती विकली आहे. त्या शेतीच्या विक्रीतून ५१ लाख ३१ हजार ४९२ रुपये मिळाले हाेते. हे पैसे त्यांनी बीड बायपास रोडवरील एचडीएफसी बँकेच्या खात्यात जमा केले होते. १२ मे रोजी रात्री आठ वाजता त्यांच्या मोबाइलचे सीमकार्ड अचानक बंद झाले. त्यानंतर फिर्यादीने कंपनीला फोन करून विचारले असता, कोणीतरी मोबाइल हरवला असल्याचे सांगून सीमकार्ड बंद करण्यास सांगितले असल्याचे समजले.
मात्र, त्याच रात्री नेट बँकिंगच्या आधारे फिर्यादीच्या वडिलांच्या बँक खात्यातून ३० लाख ५० हजार रुपये एकूण सहा बँक खात्यांत वळते करण्यात आले होते. याविषयी दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन शाखाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर बँकेचा कर्मचारी आरोपी संतोष चंदनसे याने हा प्रकार केल्याचे समोर आले. आरोपी संतोषने हे पैसे ओळखीच्या इतर सहा जणांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले होते. याशिवाय त्याने गांधेली गावातील इतर चार शेतकऱ्यांच्या नावावर क्रेडिट कार्ड घेऊन त्यावर कर्ज घेतल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. एकूण पाच शेतकऱ्यांना ४६ लाख २० हजार ८३७ रुपयांना फसविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर फिर्यादीने सातारा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे अधिक तपास करीत आहेत.