बँक अधिकाऱ्यांना बनावट नोटांची धास्ती; करावी लागते स्वतःच्या खिशातून भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 02:17 PM2019-12-21T14:17:04+5:302019-12-21T14:19:12+5:30
राष्ट्रीयीकृत बँका असो वा खाजगी बँक, तसेच पतसंस्था येथील कॅशियर व अन्य अधिकाऱ्यांना नोटा हाताळताना सदैव सावध राहावे लागत आहे.
औरंगाबाद : बँकेत दररोज बनावट नोटा येत आहेत. मात्र, कॅशिअरची दक्षता व अद्ययावत उपकरणामुळे बंडलमध्ये येणारी बनावट नोट लगेच शोधली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात आजघडीला सुमारे ५० कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा व्यवहारात फिरत आहेत. या नोटा फिरून शेवटी बँकेत जमा होण्यासाठी येतात. नजरचुकीने एखादी नोट जमा झाली तर तेवढी रक्कम अधिकाऱ्यांना स्वत:च्या पगारातून द्यावी लागते. यामुळे बनावट नोटांविषयी बँक अधिकाऱ्यांमध्ये कमालीची धास्ती आहे.
राष्ट्रीयीकृत बँका असो वा खाजगी बँक, तसेच पतसंस्था येथील कॅशियर व अन्य अधिकाऱ्यांना नोटा हाताळताना सदैव सावध राहावे लागत आहे. विशेषत: १००, ५०० व २ हजार रुपयांचे बंडल जेव्हा येते तेव्हा त्याची तीन ते चार वेळेस तपासणी करावी लागत आहे. बनावट नोटा शोधणाऱ्या उपकरणातून एक नोट दोनदा तपासून खात्री करून मगच जमा करून घ्यावी लागत आहे. बँकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, बँकेच्या एका शाखेत महिन्यातून २० ते ३० बनावट नोटा येतात. मात्र, ग्राहकांना सांगून त्या नष्ट केल्या जातात किंवा पोलिसांत तक्रार दिली जाते. बँका शक्यतो ग्राहकांचा राग ओढवून घेत नाही; पण एका व्यक्तीकडे ४ पेक्षा अधिक बनावट नोटा निघाल्या तर याची तक्रार पोलिसांत देण्यात येते. करन्सीचेस्टमधील व्यवस्थापकाने सांगितले की, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाजारात आजघडीला चलनात असलेल्या ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या नोटा बनावट आहेत.
ज्या बनावट नोटा येतात त्यात १०० रुपयांची नोटही रंगीत झेरॉक्स काढलेली असते, तर ५०० व २ हजार रुपयांची हुबेहूब बनावट नोट असते. पेट्रोलपंपावर गर्दीत नागरिक या नोटा चालविण्याचा प्रयत्न करतात. नजरचुकीने एखाद्याकडून बनावट नोट आली व ती बँकेने स्वीकारली नाही, तर पेट्रोलपंपचा मालक त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या पगारातून तेवढी रक्कम वजा करतो. यामुळे पेट्रोलपंपावरही कर्मचारी आता सावध झाले आहेत. दररोज हाताळून त्यांनाही असली व नकली नोटा सहज कळत आहेत.
नवीन नोटांची हुबेहूब नक्कल
फाटक्या नोटा खरेदी करणाऱ्यांनी सांगितले की, नोटाबंदीआधी जुन्या ५०० व १ हजार रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात चलनात होत्या. ही समांतर अर्थव्यवस्था मोडीत काढण्यासाठी या मोठ्या रकमेच्या जुन्या नोटांवर बंदी आणली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने ५०० व २ हजार रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणल्या; पण या नोटांचीही हुबेहूब नक्कल करून त्या व्यवहारात आणल्या जात आहेत. ४पोलीस बनावट नोटा तयार करणाऱ्यांना शोधून त्यांना अटक करीत आहेत. ग्राहक फाटक्या नोटांमध्येही बनावट नोटा आणून देतात; पण आम्ही त्या नोटा लगेच ओळखतो व पोलिसांत देण्याची धमकी देतो. त्यामुळे बनावट नोट खपविणारे निघून जातात.