Video : बँकेच्या सायरने उडविली मध्यरात्री सर्वांची झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:43 PM2019-12-13T13:43:37+5:302019-12-13T13:53:13+5:30
सुरक्षेच्या कारणास्तव धावले सिडको एमआयडीसी पोलीस,नगरसेवक, कार्यकर्ते
औरंगाबाद : बँकएटीएम फोडणे, मशीन्स पळविणे, चोरी होणे या कारणांवरून एटीएम सुरक्षा सध्या चर्चेचा आणि गांभिर्याचा विषय झालेला आहे. शहरातील बहुतांश एटीएम सुरक्षारक्षकांविनाच आहेत. त्यांची सुरक्षा बँकेने सुरक्षारक्षक नेमून करण्याऐवजी बेजबाबदारपणे पोलीसांवरच सोपवून टाकली आहे. एटीएमला कुठलीही सुरक्षा नसल्यामुळे एन-१ परिसरातील सिंडीकेट बँकेच्या सायरने शुक्रवारी पहाटेपर्यंत सर्वांची झोप उडवून टाकली.
रात्री १ वाजेच्या सुमारास सायरनचा आवाज सुरू झाला, तो पहाटेपर्यंत सुरू होता. बँकेच्या व्यवस्थापला स्थानिक नगरसेवक मनोज गांगवे, विशाल गंगावणे, गणेश गांगवे, स्वप्नील चव्हाण आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी तासभर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु व्यवस्थापकाने प्रतिसाद दिला नाही. शेवटी एमआयडीसी सिडको पोलीसांच्या रात्रगस्त पथकातील सहा ते सात कर्मचाऱ्यांनी एटीएमच्या आत जाऊन काही गडबड आहे का? याची खातरजमा केली. त्यानंतर नगरसेवक गांगवे यांना फायर अलार्म वाजत असल्याचे लक्षात आले. त्या अलार्मचे कनेक्शन तोडल्यानंतर एटीएममधील आवाज बंद झाला, परंतु बँकेच्या आतील फायर अलार्मचे सायरने मोठ्या आवाजाने सुरू झाले.
रस्त्यावर येणारा आवाज कमी झाला परंतु बँकेच्या आत धोकादायकरीत्या फायर अलार्म वाजण्यास सुरूवात झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थापकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही प्रतिसाद मिळाला नाही. बँकेच्या एटीएमबाहेर अशा घटना घडत असतील तर सुरक्षारक्षक नेमण्याची किती गरज आहे, हे या घटनेमुळे समोर आले आहे.
बहुतांश एटीएम सुरक्षारक्षकांविना
शहरातील बहुतांश एटीएम हे सुरक्षारक्षकांविना आहे. परराज्यातील टोळ्यांकडून एटीएम फोडून रक्कम लंपास करण्याच्या घटना मागील तीन ते चार महिन्यांत समोर आल्या आहेत. एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक असल्यास किमान चोरीच्या घटनांना आळा बसू शकेल. रात्री दोननंतर रक्कम काढल्यानंतर एटीएमचे सायरन वाजतात. परंतु ते अर्ध्या मिनिटांत बंद होतात. ते बंद झाले नाहीतर त्यासाठी सुरक्षारक्षक असणे गरजेचे असते, नसता सिंडीकेट बँकेसारखा प्रकार सर्वत्र घडल्यास पोलीसांना धावपळ करावी लागेल.