बँकांतील कामकाज ठप्प
By Admin | Published: June 22, 2017 11:15 PM2017-06-22T23:15:52+5:302017-06-22T23:17:35+5:30
पाथरी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना बीएसएनएलचे केबल १७ जून रोजी तुटले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच बँकेतील आॅनलाईन व्यवहार ठप्प झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना बीएसएनएलचे केबल १७ जून रोजी तुटले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच बँकेतील आॅनलाईन व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी ग्राहकांना चार दिवसांपासून गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पाथरी शहरातून राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो. सध्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. १७ जून रोजी शासकीय विश्रामगृह आणि पोलिस ठाण्यादरम्यानचे काम करताना बीएसएनएलची केबल तुटली आहे. त्यामुळे अगोदरच आठ दिवसांपासून सलाईनवर कामकाज सुरू असलेल्या शहरातील स्टेट बँक आॅफ हैदराबाद, महाराष्ट्र ग्रामीण बँक, भारतीय स्टेट बँक, बँक आॅफ महाराष्ट्र या प्रमुख बँकेतील इंटरनेट सेवा खंडित झाली आहे. त्यामुळे आॅनलाईन कामकाज बंद पडले. सर्व व्यवहार ठप्प झाल्याने तसेच शनिवारी पैसे काढता न आल्याने ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागला.
रविवारी इंटरनेट सेवा सुरू होईल, असे वाटत होते. परंतु, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार असे सलग चार दिवस बँकेतील व्यवहार बंदच होेते. भारतीय स्टेट बँकेने तर गेट बंद करून आत कामकाज सुरू केले होते. तर व्यवहार सुरळीत होतील, या आशेने ग्राहक दिवसभर चकरा मारीत होते. आॅनलाईन कामकाज कधी सुरू होईल? याचे उत्तर मात्र बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे नव्हते. या संदर्भात २२ जून रोजी भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह सर्वच कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन इंटरनेट सेवा सुरू करण्यासंदर्भात समस्या मांडल्या. तसेच तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, बंदचे तांत्रिक कारण असले तरी ग्राहकांची मात्र मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.