टपाल विभागाच्या माध्यमातून मिळणार बँकिंगची घरपोच सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:48 AM2017-11-04T00:48:20+5:302017-11-04T00:48:24+5:30
काळानुसार बदल करत टपाल विभागाने आता बँकिंग व सेवा क्षेत्रात उतरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़ आगामी वर्षभरात देशात ६५० इंडिया पोस्ट पेमेंट बँक स्थापन करण्यात येणार असून मराठवाड्यात नांदेड आणि औरंगाबादचा समावेश आहे़ या बँकेच्या माध्यमातून बँकिंगचे सर्व व्यवहार करण्याची सुविधा ग्राहकांना घरपोच मिळेल़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : काळानुसार बदल करत टपाल विभागाने आता बँकिंग व सेवा क्षेत्रात उतरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़ आगामी वर्षभरात देशात ६५० इंडिया पोस्ट पेमेंट बँक स्थापन करण्यात येणार असून मराठवाड्यात नांदेड आणि औरंगाबादचा समावेश आहे़ या बँकेच्या माध्यमातून बँकिंगचे सर्व व्यवहार करण्याची सुविधा ग्राहकांना घरपोच मिळेल़
बँकिंग सुविधांचा लाभ पूर्वी मोजक्याच शहरांत होत होता़ त्यामुळे गावपातळीवरून पैशाच्या देवाण-घेवाणीसाठी मनीआॅर्डरशिवाय पर्याय नव्हता़ माफक शुल्क आकारुन मनीआॅर्डर केल्यास टपाल खात्याचा कर्मचारी घरपोच पैसे आणून देत होता़ आॅनलाईनच्या काळात केवळ बँकिंगच नव्हे, तर सर्व व्यवहार इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून घरबसल्या होत आहेत़ त्यामुळे एटीएमला म्हणावी तशी गर्दी व्यवहारासाठी दिसून येत नाही़ पिग्मी बँक, ठेवी योजना यासह मनीआॅर्डर आदींच्या माध्यमातून प्रदीर्घ अनुभव पाठीशी असताना टपाल खात्यामार्फत सेमी बँकिंग प्रणालीत बदल करत इंडिया पोस्ट पेमेंट बँक स्थापन करण्यात येत आहे़़ सध्या ही सुविधा काही शहरांत दिली जाणार असून त्याकामी टपाल विभागाचे १ लाख ५४ हजार ८३० टपाल कार्यालयांचे जाळे व साडेपाच लाख मनुष्यबळ उपयोगात आणले जाणार आहे़
नांदेड जिल्ह्यात मुख्य टपाल कार्यालयासह ५१ उपटपाल कार्यालये आहेत़ ४१६ पोस्टमन जिल्ह्यातील विविध टपाल कार्यालयाअंतर्गत सेवा पुरवितात.़ त्यांचा वापर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेसाठी करुन घेतला जाणार आहे़ प्रत्येक पोस्टमनकडे जीपीएस कनेक्टेड यंत्र पुरविण्यात येणार आहे़ खाते उघडण्यापासून बँकेचे प्रत्येक व्यवहार डोअर स्टेप बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना घरपोच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत़
नांदेड येथे इंडिया पोस्ट पेमेंट बँक मुख्य टपाल कार्यालयात सुरु होणार आहे़ त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध होणार असून कार्यालयीन सामग्री, फर्निचरचे काम पूर्ण झाले आहे़ विद्युतीकरणाचे कामही अंतिम टप्प्यात आहे़ एप्रिल-२०१८ च्या प्रारंभी ही सुविधा नांदेडात उपलब्ध होणार असल्याचे प्रधान डाक अधीक्षक एस़़ एम़ अली यांनी सांगिले़ यावेळी मुख्य टपाल कार्यालयाचे पोस्ट मास्टर बी़़ एम़ माकोडे, जनसंपर्क अधिकारी गंगाधर गुंगेवार उपस्थित होते़
मोबाईल बँकिंग, एटीएम सुविधा यापूर्वीच सुरु करण्यात आलेली आहे़ आता आयपीपीएल बँकिंगच्या माध्यमातून बँकिंग व सेवा क्षेत्रातील सर्व सुविधा टपाल खाते उपलब्ध करुन देणार आहे़ जिथे बँकिंग सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी पोस्टल बँक प्रभावी ठरणार आहे़ विशेषत: ग्रामीण भागाला याचा अधिक उपयोग होणार आहे़