औरंगाबादेत बंदी असलेले दीड लाखांचे ई-सिगारेट पकडले, मोबाईलच्या दुकानात थाटला गोरखधंदा
By राम शिनगारे | Published: September 24, 2022 07:50 PM2022-09-24T19:50:18+5:302022-09-24T19:51:00+5:30
क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अनिता बागुल यांना दलालवाडीतील मामाज टेलीकॉम नावाच्या दुकानात बंदी घालण्यात आलेली ई सिगारेटची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली.
औरंगाबाद : देशात बंदी असलेल्या ई सिगारेटची विक्री एका मोबाईल ॲक्सेसरीजच्या दुकानातुन करण्यात येत असल्याची माहिती मिळताच क्रांतीचौक पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात बंदी असलेल्या १ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या २५० ई सिगारेट पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिली.
क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अनिता बागुल यांना दलालवाडीतील मामाज टेलीकॉम नावाच्या दुकानात बंदी घालण्यात आलेली ई सिगारेटची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बागुल यांनी निरीक्षक डॉ. दराडे यांची परवानगी घेत हवालदार नरेंद्र गुजर, शेख मुश्ताक, हनुमंत चाळणेवाड, शरद देशमुख आणि रामदास ठोकळ यांच्यासह मामाज टेलीकॉम दुकानावर छापा मारला. या छाप्यात दुकान मालक मोहम्मद मुस्तफा मोहम्मद युनूस हिंगाेरा (रा. करीम कॉलनी, रोशनगेट) यास पकडण्यात आले. तसेच त्याच्याकडून बंदी असलेल्या युओटो कंपनीच्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या २५० ई सिगारेटस जप्त करण्यात आल्या. या सिगारेटस्ची किंमत ही १ लाख ५० हजार रुपये एवढी आहे. ही कामगिरी निरीक्षक डॉ. दराडे यांच्या मार्गदर्शनात केली.