बनवाबनवी ! महिला व बालहक्क विधीमंडळ समितीची जाताच बचत गटांचे 'कॉप-शॉप' गुंडाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 07:11 PM2021-10-28T19:11:06+5:302021-10-28T19:15:17+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत महिला स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची थेट विक्री करणारे कॉप - शॉप या नावाने खुलताबाद पंचायत समिती अभियान व्यवस्थापन कक्षाने सुरु केले होते.
- सुनील घोडके
खुलताबाद (औरंगाबाद ) : महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या महिला व बालहक्क समितीने आज खुलताबाद येथे भेट देवून माहिती घेतली. या समितीला खुश करण्यासाठी अधिकाऱ्यांनी बचत गटाच्या महिलांच्या वस्तू विक्रीचे दुकान थाटले होते. समितीने पाठ फिरविताच हे दुकान गुंडाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यामुळे अधिका-यानी समितीबरोबर बनवाबनवी केल्याची चर्चा पंचायत समिती आवारात होती.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत महिला स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची थेट विक्री करणारे कॉप - शॉप या नावाने खुलताबाद पंचायत समिती अभियान व्यवस्थापन कक्षाने सुरु केले होते. मात्र, हे दुकान काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते मात्र उद्घाटनंतर काही तासातच हे कॉप - शॉप दुकान गुंडाळून ठेवण्यात आले होते. दरम्यान आज गुरुवार दिनांक २८ रोजी महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या महिला व बालहक्क समितीच्या आमदार मनीषा कायंदे , आमदार लताबाई सोनवणे , आमदार मंजुळा गावित या महिला व बालकांचे समस्या जाणून घेण्यासाठी व शासनाने त्यांच्या करिता असलेल्या विविध योजना किती प्रभावीपणे राबविण्यात आल्या याची माहिती घेत असताना विधी मंडळ समितीस खुश करण्यासाठी गुंडाळून ठेवण्यात आलेले कॉप - शॉप दुकान घाईघाईने मांडण्यात आले. संमतीला बचत गट व त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू नियमित विक्री करण्यात येत असल्याची माहिती देवून अधिकारी व कर्मचार्यांनी शाबासकी मिळविली. मात्र, समिती जाताच कॉप - शॉप दुकान गुंडाळून ठेवण्यात आले. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या बनवाबनवीची चर्चा पंचायत समिती आवारात चांगलीच रंगली होती.
समितीने नगरपरिषद कार्यालयात घेतला आढावा महिला व बालहक्क समितीनेनगरपरिषदेत महिलांच्या बचत गटाच्या बाबतीत राबविण्यात येणाऱ्या योजना बाबत माहिती घेतलीत्याच बरोबर महिलांचा आरोग्य सर्वे करणे , महिलांचे शंभर टक्के लसीकरण करणे तसेच १४ व्या वित्त आयोगातून महिलांसाठी ५ टक्के राखीव ठेवण्याचे निर्देश दिले. यावेळी नगराध्यक्ष एस. एम. कमर , शिवसेना तालुका प्रमुख राजू वरकड , तहसीलदार सुरेंद्र देशमुख , गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर , मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी , महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती लक्ष्मीताई लाळे ,कार्यालयीन अधीक्षक संभाजी वाघ ,यांच्यासह पदाधिकारी ,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.