‘बाप्पा, धन-दौलत कमी दे, मुलींच्या अब्रूची हमी दे’; २ हजार मुलींचे पत्रातून गणरायाला साकडे

By प्रशांत तेलवाडकर | Published: September 9, 2024 08:05 PM2024-09-09T20:05:03+5:302024-09-09T20:05:43+5:30

छत्रपती संभाजीनगरातील ३० शाळांतील मुलींनी लिहिले पत्र; कुलस्वामिनी प्रतिष्ठानने जमा केली पोस्टकार्ड

'Bappa, give less wealth, guarantee the dignity of girls'; 2,000 girls sent letters to Ganaraya | ‘बाप्पा, धन-दौलत कमी दे, मुलींच्या अब्रूची हमी दे’; २ हजार मुलींचे पत्रातून गणरायाला साकडे

‘बाप्पा, धन-दौलत कमी दे, मुलींच्या अब्रूची हमी दे’; २ हजार मुलींचे पत्रातून गणरायाला साकडे

छत्रपती संभाजीनगर : ‘प्रिय, गणपती बाप्पा, धन-दौलत कमी दे, पण मुलींच्या अब्रूची हमी दे’, ‘बप्पा, येथे स्त्रियांवर खूप अत्याचार सुरू आहेत. तू धरतीवर आल्यावर त्या नराधमांना ठार मार’, असे पोस्ट कार्डद्वारे सुमारे २ हजार शालेय विद्यार्थीनींनी बाप्पाला साकडे घातले आहे. पत्राच्या एका बाजूने नराधमापासून रक्षणाचे आवाहन केले, तर दुसऱ्या बाजूने अंत:करणात दडलेल्या गणपतीचे सुंदर चित्र साकारले आहे.

मुली असो वा तरुणी किंवा महिला कोणीच सुरक्षित नाही, हे या पत्रांवरून सिद्ध होते. दररोज होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या घटनेमुळे शालेय मुलींच्या मनावर किती खोलवर ‘भीती’ दडली गेली आहे, याचे सत्य या पत्रांमधून उजेडात आले. त्यांची दखल घेतली, ती सिडको एन-६ येथील कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळाने. त्यांनी शाळेत जाऊन पोस्टकार्ड वाटले व मुला-मुलींना त्यावर गणेशाचे चित्र व संदेश पाठविण्याचे आवाहन केले होते. शहरातील ३० शाळांतील २ हजार विद्यार्थ्यांनी पत्र प्रतिष्ठानकडे पाठविले. यातील ५० टक्के मुलींनी समाजात होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली. ११ वर्षांच्या शिवेंद्र या विद्यार्थ्याचे पत्रही तेवढेच बोलके आहे. ‘माझ्या प्रिय बप्पा, माझी काळजी घ्यायला तू आई आणि ताई दिलीस, पण आज ताई आणी सगळ्या महिला वर्गाची काळजी घेण्याची गरज आहे, तेव्हा तू अशी जादू कर आणि सगळ्या ताई आणि आईला कराटेचे व स्वरक्षणाचे प्रशिक्षण दे’. मुलांमध्येही स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचाराची शालेय मुलांमध्येही किती संतापाची भावना आहे, हे दिसून येते. २ हजार शालेय विद्यार्थिनी, विद्यार्थ्यांसोबतच सुमारे १ हजार नागरिकांनीही पत्रातून बप्पाला धरतीच्या रक्षणाचे साकडे घातले आहे.

पंतप्रधानांना पाठविणार पत्र
‘पोस्ट कार्डवर गणपतीचे चित्र काढा व संदेश पाठवा’ असे आवाहन कुलस्वामिनी प्रतिष्ठानने केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. काही पत्र वाचून, तर मन खिन्न होते. मुली असो वा महिला सर्वांच्या संरक्षणाचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे यावरून कळते. हे सर्व पत्र नागरिकांना वाचण्यासाठी कुलस्वामिनी मंगल कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. शालेय मुलींनी गणपतीला साकडे घातले आहे, तरी पण गणेशोत्सवानंतर हे सर्व पोस्टकार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येतील. अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, असा कायदा संसदेमध्ये करण्याची मागणी यातून करण्यात येणार आहे.
- विलास कोरडे, कुलस्वामिनी प्रतिष्ठान.

विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गणेश चित्राचे फिरते प्रदर्शन
२ हजार विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्डवर गणपती बाप्पाचे चित्र साकारले आहे. असे ७०० चित्र एका पांढऱ्या रंगाच्या कारवर चिकटविण्यात आले आहे. त्यांचे ‘गणेश दर्शना’चे हे फिरते प्रदर्शन आहे. संपूर्ण गणेशोत्सवातही ‘गणेश दर्शना’ची कार शहरभर फिरविण्यात येणार आहे.

Web Title: 'Bappa, give less wealth, guarantee the dignity of girls'; 2,000 girls sent letters to Ganaraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.