शहरातील पोलिसांना बाप्पा पावला, रखडलेल्या पदोन्नती जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:02 AM2021-09-21T04:02:57+5:302021-09-21T04:02:57+5:30
औरंगाबाद : शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला. न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या देण्याचा निर्णय ...
औरंगाबाद : शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला. न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी जाहीर केला. उपायुक्त मीना मकवाना यांनी शनिवारी (दि.१८) सायंकाळी आदेश काढले. यात ४ जणांना सहायक फाैजदार तर १५२ जणांना हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली.
शहर पोलीस दलात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना मागील काही दिवसांपूर्वी सहायक फाैजदारपदी पदोन्नती देण्यात आली होती. यानंतर, नाईक पदावरील कर्मचाऱ्यांना हवालदारपदी पदोन्नतीचा विषय शनिवारी मार्गी लावण्यात आला. सहायक फाैजदारपदी पदोन्नती मिळालेल्यांमध्ये गोरखनाथ नामदेव कडू, भागीनाथ विष्णू अंगुणे, सुनील राघोबा म्हस्के, प्रकाश गोविंदराव सोनवणे यांचा समावेश आहे. याशिवाय पोलीस नाईक १५२ कर्मचाऱ्यांना विभागीय पदोन्नती समितीने पोलीस हवालदारपदी पदोन्नती दिली. ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्याच ठिकाणी पदोन्नतीवर कार्यभार पाहतील, असेही आदेशात म्हटले. पदोन्नतीतील आरक्षण याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या असून, त्या याचिकांच्या आधिन राहूनच या पदोन्नती देण्यात आल्या आहेत. पदोन्नती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, उपायुक्त प्रशासन मीना मकवाना यांनी अभिनंदन केले.