बाप्पाला आज निरोप
By Admin | Published: September 15, 2016 12:33 AM2016-09-15T00:33:04+5:302016-09-15T00:37:37+5:30
औरंगाबाद : १० दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपतीबाप्पा गुरुवारी सर्वांचा निरोप घेणार आहेत. ‘गणपती चालले गावाला... चैन पडेना जिवाला’ अशीच मन:स्थिती प्रत्येक गणेशभक्ताची झाली आहे.
औरंगाबाद : १० दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपतीबाप्पा गुरुवारी सर्वांचा निरोप घेणार आहेत. ‘गणपती चालले गावाला... चैन पडेना जिवाला’ अशीच मन:स्थिती प्रत्येक गणेशभक्ताची झाली आहे. पण ‘पुढच्या वर्षी लवकर या,’ अशी विनंती करीत बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. श्री मूर्ती विसर्जनासाठी शहरात पाच ठिकाणी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
शहरातील मुख्य ‘श्री’ विसर्जन मिरवणूक राजाबाजार येथील श्री संस्थान गणपती मंदिर चौकातून सकाळी १०.३० वाजता निघणार आहे. तत्पूर्वी गणेश महासंघ उत्सव समितीच्या समर्थनगर येथील सावरकर चौक परिसरातील कार्यालयात श्रीच्या मूर्तीची आरती होणार आहे. तेथून उत्सव समितीचा गणपती राजाबाजारात आणण्यात येणार आहे. संस्थान गणपती मंदिरात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आ. सतीश चव्हाण, आ.संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ.सुभाष झांबड, आ.भाऊसाहेब चिकटगावकर, आ. विक्रम काळे, आ. इम्तियाज जलील, आ.नारायण कुचे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, माजी आ.कल्याण काळे, प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींच्या मूर्तीची आरती करण्यात येणार आहे. यानंतर मुख्य मिरवणुकीला सुरुवात होईल. महासंघ उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार व अध्यक्ष अभिजित देशमुख मान्यवरांचे स्वागत करणार आहेत.
सिडको-हडको गणेश महासंघ
सिडको-हडको गणेश महासंघाची मुख्य श्री विसर्जन मिरवणूक सिडको एन-६ परिसरातील आविष्कार कॉलनी चौकातून दुपारी ३ वाजता निघणार आहे. यानिमित्ताने येथे आयोजित कार्यक्रमात विसर्जन मिरवणुकीचे उद्घाटन खा.चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते होणार आहे.
अध्यक्षस्थानी आ. सुभाष झांबड. प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आ. अतुल सावे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे. मान्यवरांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष सुदाम सोनवणे व अध्यक्ष संभाजी सोनवणे करणार आहेत.