बापरे! बाळाच्या आगमनाच्या आनंदातही ३२ टक्के गर्भवती कौटुंबिक हिंसाचारग्रस्त
By संतोष हिरेमठ | Published: July 17, 2024 08:00 PM2024-07-17T20:00:04+5:302024-07-17T20:00:11+5:30
गर्भपात, मुदतपूर्व प्रसूतीचा धोका : गर्भातील बाळाच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती
छत्रपती संभाजीनगर : बाळाच्या आगमनाच्या आनंदातही ३२ टक्के गर्भवती महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक बाब घाटीतील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाने केलेल्या एका अभ्यासातून उघडकीस आली आहे. गरोदरपणात महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते, परंतु कौटुंबिक हिंसाचारामुळे त्यांना ताण-तणाव, चिंता, आणि इतर शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे गर्भातील बाळावरही विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
घाटीतील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात ‘मुक्ता’ हा प्रकल्प राबविण्यात येतो. जागतिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णालयात येणारी महिला कौटुंबिक हिंसाचाराला तर सामोरे जात नाही ना, याची पडताळणी केली जाते. ही पडताळणी करताना महिलेस थेट विचारणा केली जात नाही. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या भेटीदरम्यान तिच्यात कौटुंबिक हिंसाचारासंदर्भात काही लक्षणे दिसली तर विश्वासात घेऊन विचारणा होते. गरोदर मातेने स्वत:हून माहिती दिली तर तिचे समुपदेशन केले. तिने परवानगी दिली तर कुटुंबीयांचेही समुपदेशन केले जाते. कौटुंबिक हिंसाचाराची व्याप्ती अधिक असेल तर ‘प्रोटेक्शन ऑफिसर’ला माहिती दिली जाते. हे अधिकारी परिस्थितीनुसार मातेच्या घरी भेट देतात. मातांच्या समुपदेशनासाठी अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. श्रीनिवास गडप्पा, डाॅ. विजय कल्याणकर, डाॅ. प्रशांत भिंगारे, डाॅ. अनुराग सोनवणे, डाॅ. रुपाली गायकवाड आदी प्रयत्नशील असतात.
किती महिलांचा अभ्यास?
या अभ्यासात ९९० महिलांचा अभ्यास करण्यात आला. यातील ३२ टक्के महिलांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग दर ४ वर्षांनी असा अभ्यास करतो. गरोदरपणात अधिक उलट्या होणे, मळमळ होणे, वारंवार रुग्णालयात येण्याची वेळ येणे, यासह काही बाबीतून कौटुंबिक हिंसाचार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मातेने होकार दिला तरच अधिक विचारणा केली जाते. कौटुंबिक हिंसाचारामुळे गर्भपात, मुदतपूर्व प्रसूती, प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव, गर्भातील बाळावर परिणाम होण्याची भीती नाकारता येत नाही, असे डाॅ. गडप्पा म्हणाले.
कौटुंबिक हिंसाचारात काय?
महिलेला मारहाण, आर्थिक छळ, मानसिक त्रास, वारंवार टोमणे, भावनिक त्रास या बाबी कौटुंबिक हिंसाचारात मोडल्या जात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. महिलांच्या सन्मानासाठी त्यांच्या आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने अमलात आणणे गरजेचे आहे. तसेच, महिलांना आपले हक्क आणि अधिकारांची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून त्या अशा हिंसाचाराला सामोरे जाऊ नयेत.