संस्थान गणपती मंदिरातील दानपेटी पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 06:32 PM2018-12-23T18:32:13+5:302018-12-23T18:32:26+5:30
राजाबाजार संस्थान गणपती मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली. यात जवळपास ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
चोरट्यांनी गाठला कळस : वर्दळीच्या मंदीरातून पहाटे दान पेटी पळविल्याने भाविकांमध्ये संताप
औरंगाबाद : राजाबाजार संस्थान गणपती मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली. यात जवळपास ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. रविवारी पहाटे साडेचार ते पावणे पाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली. दानपेटी पळविणारे दोन चोरटे आणि त्यांची रिक्षा सीसीटिव्हीत कैद झाली असून, पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
शहराचे आराध्य दैवत म्हणून राजाबाजार येथील संस्थान गणपती ओळखले जाते. संस्थान गणपती चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने या जुन्या मंदिराची देखरेख केली जाते. मंदिराच्या सुरक्षेसाठी व्यवस्थापनाच्यावतीने एक सुरक्षा रक्षक नियुक्त केला होता. मात्र, दीड ते दोन महिन्यांपूर्वी सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. तेव्हापासून सिटीचौक पोलिसांचा एक गार्ड नियमित मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असतो. शिवाय सीसीटिव्ही कॅ मेरेही मंदिरात बसविण्यात आले आहेत.
सिटीचौक ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी पहाटे चार वाजेपर्यंत मंदिरासमोर बसून होते. साडेचार वाजेच्या सुमारास दुध विक्रेते, वर्तमानपत्र विक्रेते, मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ सुरू झाल्याचे पाहून संबंधित पोलीस कर्मचारी ठाण्यात गेला. त्यानंतर रिक्षातून आलेल्या दोन चोरट्यांनी मंदिराच्या दारातील दानपेटी चोरून नेली. सकाळी ८ वाजेच्या सुमारास मंदिराचे विश्वस्त रमेश राधाकिसन घोडेले हे दर्शनासाठी मंदिरात गेले तेव्हा त्यांना तेथे दानपेटी दिसली नाही. त्यांनी या घटनेची माहिती लगेच मंदिरााचे अन्य विश्वस्त आणि पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक डी.एस. सिनगारे आणि कर्मचाºयांनी राजाबाजार येथे धाव घेऊन पहाणी केली. याप्रकरणी रमेश घोडले यांच्या तक्रारीवरून सिटीचौक ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर हे तपास करीत आहे.
चोरटे सीसीटीव्ही कै द
संस्थान गणपती विश्वस्त मंडळाने मंदीर आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या सीसीटिव्ही कॅमेºयात दोन्ही चोरटे आणि त्यांची दानपेटी चोरून नेण्यासाठी वापरलेली रिक्षा कैद झाली. हे सीसीटिव्हीचे फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. गुन्हेशाखा आणि सिटीचौक पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला.