दहावीच्या मूल्यांकनात शाळांकडून चुकांचा भडिमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:03 AM2021-07-09T04:03:26+5:302021-07-09T04:03:26+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर शाळांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भरलेल्या निकालात चुकांचा भडिमार ...
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर शाळांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भरलेल्या निकालात चुकांचा भडिमार केला आहे. त्या चुकांची दुरुस्ती करता-करता नाकीनऊ आल्याने विभागीय शिक्षण मंडळाकडून पुढे ३ दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे.
इयत्ता नववी व दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे दहावीचा निकाल लागणार आहे. हा निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लागेल, असे सुरुवातीला सांगण्यात येत होते. त्यानंतर १५ जुलैपर्यंत निकाल लागेल, असे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र, शाळांनी असंख्य चुका निकाल भरताना केल्या आहेत. त्यांची दुरुस्ती आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया आणखी वेळखाऊ होऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
मूल्यांकन २१ जूनपासून ऑनलाईन भरण्याचे वेळापत्रक होते. २४ जूनला शिक्षण मंडळाची संगणकीय प्रणाली सुरळीत सुरू झाली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी ३० जूनपर्यंतची मुदत २ दिवस वाढविल्याने २ जुलैपर्यंत हे काम चालले. त्यानंतर दुरुस्ती, विषय बदल, त्रुटी आदी कामे सध्या बोर्डाच्या ईडीपी विभागाकडून सुरू आहेत.
---
मुदतवाढीची विनंती केली
निकाल भरल्यावर निश्चिती केली नाही. श्रेणी व्यवस्थित टाकली नाही. माध्यमांतील बदल केला. संपूर्ण शाळा राखीव ठेवली. आता पूर्ण शाळेचे गुण बोर्डाला भरायचे आहेत. अशा असंख्य चुका आहेत. चुकांचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्यानुसार त्यांच्या दुरुस्त्यांची संख्याही वेगवेगळी आहे. त्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. नऊ जुलैपर्यंत मुदत होती. ती आम्हाला १०, ११, १२ जुलैपर्यंत किमान तीन दिवस वाढवून हवी आहे, असे विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव आर. पी. पाटील यांनी सांगितले.
---
या विद्यार्थ्यांचे निकाल रखडणार...
विभागीय शिक्षण मंडळात दहावीसाठी अर्ज केलेल्या १ लाख ७७ हजार ७६२ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ५६० विद्यार्थ्यांचा निकाल अंतिम केलेला नाही. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात ६०१ जणांच्या निकालाची निश्चिती झाली नाही, तर ९७ विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे अपूर्ण व निकाल निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाची जबाबदारी शाळांवर आली आहे. राहिलेल्या विद्यार्थ्यांचे करायचे काय, याबद्दल मुदतवाढ मिळाली नाही.