महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात बेस बॉल टोपीची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 06:53 PM2019-04-26T18:53:02+5:302019-04-26T18:53:23+5:30
बेस बॉल टोपी घातली तरी पारंपरिक टोपीसुद्धा सोबत बाळगावी लागणार आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्रपोलिसांच्या गणवेशात बेस बॉल नावाच्या एका अतिरिक्त टोपीची भर पडली आहे. याबाबतचे परिपत्रक पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी जारी केले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकपर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचा भाग म्हणून फटिंग टोपी वापरतात. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळताना धावपळीत पोलिसांच्या डोक्यावरील टोपी पडण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन ही अतिरिक्त टोपी देण्यात आली आहे. बेस बॉल टोपीमुळे ऊन, पाऊस यापासून संरक्षण होते. शिवाय ती डोक्यात घट्ट बसत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगी डोक्यावरून पडत नाही. पारंपरिक टोपीसोबतच पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षकपदावरील कर्मचाऱ्यांसाठी काळ्या रंगाची बेस बॉल टोपी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यासंबंधीचा आदेश परिपत्रकात राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना देण्यात आला आहे. आपल्या स्तरावर अशा विहित नमुन्यातील टोप्या बनवून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे असले तरी पारंपरिक टोपी ठेवून दैनंदिन वापरासाठी बेस बॉल टोपी परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. यामुळे बेस बॉल टोपी घातली तरी पारंपरिक टोपीसुद्धा सोबत बाळगावी लागणार आहे.