बनावट सह्यांच्या आधारे साडेचार लाखांचा अपहार
By Admin | Published: May 25, 2016 11:57 PM2016-05-25T23:57:30+5:302016-05-26T00:05:28+5:30
औरंगाबाद : तब्बल ४ लाख ६० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बंजारा कॉलनी वसतिगृहाच्या दोन पदाधिकाऱ्यांविरोधात क्रांतीचौक ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला
औरंगाबाद : बनावट सह्या करून बोगस ठरावाच्या आधारे कागदपत्रे तयार करून तब्बल ४ लाख ६० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बंजारा कॉलनी वसतिगृहाच्या दोन पदाधिकाऱ्यांविरोधात क्रांतीचौक ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला.
मीराबाई लालसिंग चव्हाण आणि संजय भीमराव चव्हाण (दोन्ही रा. बंजारा कॉलनी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, बंजारा कॉलनी येथे समाजकल्याण विभागाकडून अनुदानप्राप्त बंजारा विद्यार्थी वसतिगृह आहे. आरोपी हे संस्थेचे पदाधिकारी असताना त्यांनी २००३-१४ या कालावधीत खोटे आणि बोगस लेटर दाखवून त्यात तक्रारदार पंडित भिका जाधव (रा. बंजारा कॉलनी) यांच्या बनावट सह्या केल्या. बनावट सह्याच्या आधारे शपथपत्र तयार केले. हे शपथपत्र आणि अन्य कागदपत्रे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात सादर केले. त्याआधारे शासनाकडून प्राप्त ४ लाख ६० हजार रुपयांचा अपहार केला. तसेच संस्थेची कागदपत्रे व्यवस्थित ठेवली नाहीत. विद्यार्थ्यांना व्यवस्थित सुविधा दिल्या नाही. शिवाय आरोपींनी धमक्या दिल्याची आणि संस्थेच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार जाधव यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश क्रांतीचौक पोलिसांना दिले आहेत. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी दिली.